Breaking News

सत्य लवकर बाहेर यावे

रुग्णालय प्रशासन व तुरुंगातील सदोष यंत्रणा तसेच या सार्‍याचा प्रशासकीय यंत्रणेकडून होणारा गैरवापर ही गुन्हेगारीशी संबंधित चित्रपटांत दर्शवली जाणारी स्थिती वास्तवातही असल्याचे ललित पाटील प्रकरणात दिसते. सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे अलीकडच्या काळात मुंबई-पुण्यासारख्या शहरांत महाविद्यालयांच्या परिसरात व उच्चभ्रू समाजात ड्रग्जचा अगदी सुळसुळाट झाल्याचे सगळीकडेच बोलले जात होते. त्यापाठोपाठच हे अवघे प्रकरण बाहेर येणे म्हणजे एकंदर परिस्थिती किती गंभीर आहे याचेच निदर्शक आहे.

ड्रगतस्कर ललित पाटील हे नाव सध्या चर्चेत आहे. पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन हा पाटील पळाल्याचे वृत्त आले आणि एखाद्या वेबसीरीजला साजेशा नाट्यपूर्ण घडामोडी या ललित पाटीलच्या प्रकरणात सातत्याने घडत आहेत. बंगळुरूहून तो चेन्नईला जात असताना त्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस पकडून नेत असताना, ‘मी पळालो नाही, मला पळवले गेले आहे, असे उद्गार काढून त्याने स्वत:ही या प्रकरणातील नाट्यपूर्णतेत भरच घातली. या प्रकरणात कुणाचा सहभाग आहे त्या सर्वांची नावे उघड करणार असल्याचेही तो म्हणाला. त्याच्या या उद्गारांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना, तेव्हा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ड्रग्जच्या रॅकेटवर सरकारच्या आदेशानुसार पोलिसांनी कठोर कारवाई सुरू केली असून मुंबई पोलिसांनी नाशिकमधील ड्रग्जच्या कारखान्यावर छापा टाकला तसेच इतरही ठिकाणी या धंद्यात गुंतलेल्या लोकांवर छापे टाकण्यात आले. या सार्‍यातून निश्चितपणे ड्रग्जचे मोठे जाळे बाहेर येईल असे म्हटले होते. आपल्याला कळलेल्या काही गोष्टी आपण आताच माध्यमांसमोर उघड करू शकत नाही. योग्यवेळी त्या सांगू असेही फडणवीस म्हणाले होते. ससून रुग्णालयावर गुन्हेगारांना मुदती वाढवून देण्यात आल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप असल्याचे सांगून यासंदर्भात दोषी असणार्‍या सर्वांवर कारवाई केली जाईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. तेव्हा ललित पाटीलला यापूर्वीच्या मविआ सरकारमधून कुणाचा वरदहस्त लाभला हे आता हळूहळू बाहेर येऊ लागले आहे. या प्रकरणातून व्यवस्थेतील अनेक दोषही पुढे आले आहेत. गोरगरीब रुग्ण जिथे उपचारांसाठी धाव घेतात त्या ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कोटींचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. रुग्णालयात दाखल असताना देखील ललित पाटील ड्रग्जचे हे रॅकेट चालवत होता याला काय म्हणावे? ललित पाटील हा यापूर्वी 2020मध्येही पोलिसांच्या रडारवर होता. त्यावेळी पिंपरी-चिंचवडमध्ये पोलिसांनी ड्रग्जचे जे रॅकेट उद्ध्वस्त केले होते, त्यात प्रामुख्याने त्याचे नाव समोर आले होते. त्याला त्यावेळी अटकही झाली होती. ललित पाटील हा छोटा राजन गँगशी संबंधित होता असेही सांगितले जाते. त्यातूनच तो ड्रग्जच्या तस्करीकडे वळला असावा. ससून रुग्णालयात दाखल असताना तो नियमितपणे एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जात असे व पुन्हा रुग्णालयात परतत असे. अशारीतीने बिनबोभाट त्याचा कारभार सुरू होता अशा कहाण्या आता सांगितल्या जात आहेत. या सार्‍यामागील सत्य चौकशीतून बाहेर येईलच. पण दरम्यान या प्रकरणातून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. अवघी व्यवस्था पोखरून केल्या जाणार्‍या या तस्करीमागील सत्य लवकर बाहेर यावे व आपल्या तरुणाईला बसत चाललेला ड्रग्जचा विळखा काही प्रमाणात तरी रोखला जावा एवढीच अपेक्षा सामान्य जनता करू शकते.

Check Also

रायगड बॅडमिंटन चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचे शानदार उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून …

Leave a Reply