Tuesday , February 7 2023

रूळ ओलांडणार्यांनो सावधान!

पनवेल रेल्वेस्थानकात रूळ ओलांडून थेट मृत्यूलाच आमंत्रण

पनवेल ः बातमीदार

पनवेल रेल्वेस्थानकावरून हजारो प्रवासी दिवसभरात इच्छित ठिकाणी प्रवास करत असतात, मात्र घाईघाईत गाडी पकडण्याच्या नादात वा शॉर्टकट मारण्याच्या प्रयत्नात थेट रेल्वे रूळ ओलांडणार्‍या प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यामुळे असे प्रवासी स्वतःच्या मृत्यूलाच आमंत्रण देत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या गर्दीत वाढ झाली आहे. अनेक प्रवासी दारावर उभे राहून मोबाइलवर गप्पा मारताना कोचखाली पडून गंभीर जखमी होतात. अनेकदा अवैध व्हेंडर्सकडून घेतलेले गुंगीचे खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे तब्बल दोन दिवस बेशुद्ध होतात, तर उशिरा रेल्वे स्थानकावर पोहचल्यामुळे धावत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करून थेट मृत्यूलाच आव्हान देतात. अशा असंख्य दुर्दैवी घटना घडूनही प्रवासी त्याबाबत कुठलीच सावधगिरी बाळगत नसल्यामुळे या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. पनवेल रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडताना प्रवासी आपला जीव टांगणीला लावत असल्याचे चित्र दिसत आहे. पनवेल व नवी मुंबई परिसरातील नागरिकांना भारताच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात जर रेल्वेने प्रवास करायचा असेल, तर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस व बांद्रा टर्मिनस ही स्टेशने गाठावी लागतात. पनवेल तसेच नवी मुंबई परिसरात दिवसागणिक शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे भारताच्या कानाकोपर्‍यात राहणारी कुटुंबे नोकरी-उद्योगधंद्याच्या निमित्ताने संबंधित शहरात स्थिरावत आहेत. पनवेल रेल्वे स्थानकावरून लाखो प्रवासी इच्छित ठिकाणी प्रवास करतात, मात्र गाडी पकडण्यासाठी, बसण्यासाठी जागा मिळविण्यासाठी थेट रेल्वे रूळ ओलांडून गाडी पकडत असतात. हा प्रकार म्हणजे थेट जीवाविषयीच एकप्रकारे बेफिकिरी आह़े. पनवेल स्थानकावर आठ प्लॅटफॉर्म आहेत़  प्लॅटफॉर्मवर एखादी एक्स्प्रेस उभी असल्यास मागून येणारी गाडी दुसर्‍या प्लॅटफॉर्मवर घेतली जाते. त्यामुळे प्रवासी घाईगर्दीत जिन्याचा वापर करण्याऐवजी थेट रेल्वे रूळ ओलांडतात. गाडी पकडण्याच्या नादात मागून एखादी गाडी येत आहे वा नाही याचीदेखील खातरजमा केली जात नाही. त्यामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होत आह़े.

मानसिकतेत बदल होत नाही

धावत्या गाडीला पकडण्याचा प्रयत्न होत असल्याने प्रवासी रेल्वेखाली येऊन मरण पावण्याच्या वा पाय कापण्याचे प्रकार घडले आहेत़. घरातून निघायला उशीर झाल्यास घाईगडबडीत रेल्वे रूळ ओलांडून इच्छीत गाडी पकडतानादेखील अनेकदा अपघात झाले आहेत, मात्र त्यानंतरही प्रवाशांच्या मानसिकतेत बदल होत नाही.

कारवाईची मागणी

पनवेल रेल्वेस्थानक परिसरात रेल्वे रूळ ओलांडताना अनेक प्रवाशांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे पकडताना दक्षता घ्यायला हवी, मात्र रेल्वे पोलिसांनीदेखील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Check Also

भाजप नेते संजय भगत यांच्या वाढदिवसानिमित्त धान्यवाटप

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप माथाडी ट्रान्सपोर्ट व सिक्युरिटी आणि महाराष्ट्र जनरल कामगार संघटना उपाध्यक्ष …

Leave a Reply