अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग समुद्रकिनार्यावर बसविण्यात आलेल्या 37 टन वजनाचा भव्य रणगाड्याचे शुक्रवारी (दि. 25) कल्याण मनपाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. त्यामुळे अलिबाग समुद्र किनार्याच्या सौंदर्यांत आणखी भर पडली आहे. या लोकार्पण समारंभास रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, पोलीस अधीक्षक अशोक दुधे, टी 55 रणगाड्यावर प्रत्यक्षात सेवा बजावलेले निवृत्त लष्करी अधिकारी कॅप्टन उमेश वाणी, रघुजी आंगे्र, लान्स नायक सुधीर पाटील यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी- कर्मचारी, नागरिक व पर्यटक उपस्थित होते. अलिबागच्या समुद्रकिनार्यावर आता वॉरट्रॉफी म्हणून बोलले जाणारा रणगाडा बसवण्यात आला आहे. हा रणगाडा पुणे खडकी येथील लष्करी कॅम्पमधून आणण्यात आला आहे. भारत-पाक युध्दात कामगिरी बजावलेला टीकेटी 55 या प्रकारातील हा रणगाडा आहे. त्याची लांबी 28 फूट असून रूंदी 12 फुट आहे. या रणगाडयाचे वजन 37 टन आहे. रणगाडा बसवण्यासाठी अलिबाग समुद्रकिनार्यावर चौथरा बांधण्यात आला आहे आकर्षक रंगीत विद्युत प्रकाश झोतात हा अधिकच खुलून दिसतो आहे. अनेक युद्ध गाजवणारा हा रणगाडा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे.