Breaking News

वाहन दुरुस्ती गॅरेजच्या जागेतच करा

पनवेल महापालिकेचे निर्देश; स्वच्छता राखण्याचीही सूचना

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकानधारकांनी वाहनांची दुरुस्ती सार्वजनिक जागेत करू नये. स्वतःच्या जागेत व्यवसाय करावा व ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत जागेची व्यवस्था करावी, असे निर्देश नुकत्याच झालेल्या पनवेल महापालिका प्रभाग समिती ‘ड’च्या बैठकीत देण्यात आले. त्याचप्रमाणे स्वच्छता राखण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली. त्यास उपस्थित गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकानमालकांनी सकारात्मक प्रतिसाद देत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘ड’मधील सर्व गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकानांचे मालक, चालक, फिटर, मॅकेनिक यांची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपायुक्त जमीर लेंगरेकर व प्रभाग समिती ‘ड’ अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक अनिल भगत, प्रभाग अधिकारी श्रीराम हजारे यांच्या उपस्थितीत झाली. पनवेल शहरामध्ये पूर्वीपासून वाहनांच्या दुरुस्तीची कामे पालिकेच्या रस्त्यावर, तसेच फूटपाथवर केली जात असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. त्याचप्रमाणे या दुरुस्ती व स्पेअर पार्ट्सच्या दुकानांसमोर दुरुस्ती करताना स्वच्छता न राखल्याने परिसर विद्रुप होतो. यामुळे वाहनचालक व पादचार्‍यांची गैरसोय होते. वाहतुकीत अडथळा, अस्वच्छता आणि गैरसोय पाहता यात योग्य ती सुधारणा होऊन नागरिक आणि गॅरेज, स्पेअर पार्ट्स दुकान चालक मालक यांना दिलासा मिळावा, यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या पुढाकाराने ही पहिल्यांदाच बैठक झाली. या बैठकीस शंभरहून अधिक गॅरेजचालक उपस्थित होते.

अरुंद आणि प्रशस्त रस्त्याला लागून चारचाकी आणि दुचाकींची गॅरेज आहेत. गॅरेजचालकांकडे दुरुस्तीसाठी येणारी वाहने रस्त्यावर उभी राहतात व फूटपाथवर कामे केली जातात. त्यामुळे कचरा होतो व रस्ता, फूटपाथवर ऑइलही सांडते. विशेष म्हणजे रस्त्यावर थांबलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. तसे होऊ नये याकरिता दुरुस्तीसाठी आलेले वाहन रस्ता किंवा फूटपाथवर उभे न करता दुकानाच्या आवारात इतरांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी ठेवण्याचे निर्देश या वेळी देण्यात आले, तसेच गॅरेजमध्ये कचरापेटी ठेवून त्यात कचरा टाकावा व स्वच्छता राखावी, असा स्वच्छता व नीटनिटकेपणाचा सल्ला गॅरेजचालकांना देण्यात आला. यापुढील काळात वाहन दुरुस्ती सार्वजनिक जागेत करून नये व हौसिंग सोसायटीच्या आवारात दुरुस्तीची कामे करताना संबंधित सोसायटीची परवानगी असावी, असे या बैठकीत सूचित करण्यात आले. व्यवसायासाठी सरकारी मालमत्तेचा वापर न करता स्वतःच्या जागेत व्यवसाय करावा व ज्यांच्याकडे जागा नाही त्यांनी 15 सप्टेंबरपर्यंत जागेची व्यवस्था करावी, असेही निर्देशित करण्यात आले.

या वेळी गॅरेज-स्पेअर्स पार्ट्स दुकानचालकांना व्यवसाय करताना भेडसावणार्‍या समस्यांबाबतदेखील चर्चा करण्यात आली. या बैठकीच्या अनुषंगाने सर्व गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकानाचे मालक, चालक, फिटर, मॅकेनिक यांनी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply