Breaking News

पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिकांची भक्तीमय लोकप्रियता

चित्रपट हे समाजावर प्रभाव टाकणारे अतिशय विलक्षण प्रभावी माध्यम आहे याचे अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या देशातील पौराणिक, धार्मिक चित्रपट, मालिका, गीत संगीत यांची अतिशय सकारात्मक लोकप्रियता. याची दीर्घकालीन परंपरा आहे. अशा लोकप्रियतेच्या काही गोष्टींवर हा फोकस. मूकपटाच्या काळापासून पौराणिक अथवा धार्मिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. आणि ते अगदी स्वाभाविक होतेच कारण, चित्रपट हे माध्यम व व्यवसाय अगदीच नवीन असताना चित्रपटासाठी कथा रचना वगैरे गोष्टींकडे पटकन वळता येणे शक्य नव्हतेच. तत्कालिक प्रेक्षकांना पटकन समजतील अशा पौराणिक काळातील गोष्टींवर दिग्दर्शकांनी जास्त फोकस ठेवला. त्यात दादासाहेब फाळके यांनी 1917 साली लंका दहन या मूकपटाची निर्मिती केली. हा चित्रपट जेथे जेथे प्रदर्शित होई तेथे तेथे जणू देवळाचे अथवा तीर्थक्षेत्राचे स्वरुप प्राप्त होई कारण प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासासाठी चित्रपटगृहाबाहेर चपला काढून मग आत जाता. त्या काळात अनेक चित्रपटगृहात खाली बसून चित्रपट पहावा लागे, तर काही चित्रपटगृहात पुढील बाजूस खाली बसण्याची व्यवस्था (त्यावरुनच पिटातला पब्लिक हा शब्दप्रयोग रुढ झाला) आणि पाठीमागे बाकडी असत. लंका दहन हा चित्रपट पाहताना काही दृश्यांच्या वेळेस प्रेक्षक पडद्याला नमस्कार करून बसत. हे केवळ श्रद्धेतून येई. हा चित्रपट 8 सप्टेंबर 1917 रोजी दक्षिण मुंबईतील वेस्ट एन्ड चित्रपटगृहात (त्याच जागी कालंतराने नाझ चित्रपटगृह उभे राहिले) तर पुणे शहरात 19 डिसेंबर 1917 रोजी आर्यन चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पुणे शहरातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात या चित्रपटाची 484 फूट लांबीची मूळ प्रिंट उपलब्ध आहे. 1942 साली एकाच वेळी मराठी व हिंदी अशा दोन भाषेत रामराज्य या चित्रपटाची निर्मिती प्रकाश चित्र या चित्रपट निर्मिती संस्थेच्या वतीने करण्यात आली. दिग्दर्शन विजय भट्ट यांचे होते. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट काळातील हा चित्रपट आहे. दोन्हीतील बरेचसे कलाकार जवळपास सारखेच आहेत, पण मराठीतील चित्रपटावर तांत्रिक सोपस्कार काहीशे उशीरा झाले असा एक संदर्भ आहे. म्हणून मराठीतील रामराज्य 1944 साली पडद्यावर आला. हा चित्रपट ’वाल्मीकी रामायण’ याच काव्यावर आधारित आहे. त्यावरून चित्रपटासाठीची दृश्य कथा, पटकथा व संवाद विष्णुपंत औंधकर यांची लिहिली. गीते राजा बढे, संगीत शंकरराव व्यास, छायाचित्रणकार पी. जी. कुकडे आणि संकलन प्रताप दवे यांचे आहे. या चित्रपटात हिंदी आवृत्तीत राम प्रेम अदीब यांनी साकारला तर मराठीत चंद्रकांत यांनी साकारला. दोन्हीत शोभना समर्थ यांनी सीता साकारलीय (हा चित्रपट पूर्ण होईपर्यंत प्रेम अदीब आणि शोभना समर्थ यांनी सिगारेट अथवा दारु पिऊ नये असा त्यांच्याशी करार करण्यात आला होता अशी बरीच चर्चा रंगली. त्या काळात एकूणच चित्रपट निर्मिती अतिशय भक्तीभावनेने केली जात असे. आज या गोष्टी आख्यायिका वाटतात. त्या काळात ही वस्तूस्थिती होती.) या चित्रपटात विनय काळे, बंडोपंत सोहोनी, यशवंत केळकर, मधुसूदन, व्ही. डी. पंडित, अमीराबाई कर्नाटकी, रंजना, शांताकुमारी, लीला पवार, बेबी तारा, बेबी कल्पना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात एकूण दहा गाणी आहेत. या चित्रपटाचे सर्व चित्रीकरण मुंबईत प्रकाश स्टुडिओत करण्यात आले. त्या काळात स्टुडिओत अनेक प्रकारचे सेट लावून सगळे चित्रीकरण केले जाई.
हा चित्रपट मुंबईत दक्षिण मध्य मुंबईतील ग्रॅन्ड रोड येथील सुपर टॉकीजमध्ये प्रदर्शित झाला.(हे चित्रपटगृह आजही कार्यरत आहे हे विशेष) दिवसा दोन खेळ हिंदीचे तर एक खेळ मराठीचा असे. या चित्रपटाने अभूतपूर्व लोकप्रियता संपादल्याने सुपर थिएटरमध्ये या चित्रपटाने 102 आठवड्यांचा मुक्काम केला. हा चित्रपट सुरू होण्यापूर्वी प्रेक्षक अतिशय भक्तिभावाने पडद्यासमोर नारळ फोडून नमस्कार करत. (अशा प्रेक्षकांनी आपल्या देशात चित्रपट रुजवला हे विसरु नये.) विशेष उल्लेखनीय गोष्ट, 5, 6 व 7 मे 1947 रोजी अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या आधुनिक कला संग्रहालयात या चित्रपटाच्या आयोजित करण्यात आलेल्या खेळांना उत्तम प्रतिसाद मिळाला. विशेष उल्लेखनीय गोष्ट, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आयुष्यात पाहिलेला एकमेव चित्रपट अशी तात्कालिक मुद्रित माध्यमातून बातमी प्रसिद्ध झाली आणि अगदी आजही या विशेष गोष्टीची नोंद घेतली जाते. सतराम रोहरा निर्मित जय संतोषी मा (1975) या चित्रपटांच्या अभूतपूर्व क्रेझने जणू इतिहास घडवला.. अनेक गावांत हा चित्रपट हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असतानाच संतोषीमातेचे मंदिर उभे राहिले. ग्रामीण भागात थिएटरबाहेर चपला काढून प्रेक्षक आत प्रवेश करीत. मै तो आरती उतारु रे या गाण्याच्या वेळेस प्रेक्षक उभे राहून आरती करीत. गाणे संगीत प्रसाद वाटत. आपल्याला आवडलेला चित्रपट प्रेक्षक फक्त पडद्यावर ठेवत नाहीत तर तो असा डोक्यावर घेतात. मुंबईत हा चित्रपट 30 मे 1975 रोजी प्रदर्शित झाला आणि सामाजिक वातावरण ढवळून निघायला सुरुवात झाली. त्यानंतर 15 ऑगस्ट 1975 रोजी रमेश सिप्पी दिग्दर्शित शोले पडद्यावर आला तरी ’जय संतोषी मा’ची क्रेझ कायम राहिली यातच या चित्रपटाची जबरा क्रेझ स्पष्ट दिसून येते. आजही या सर्व गोष्टींची पुन्हा पुन्हा चर्चा रंगते.
रामानंद सागर निर्मित व दिग्दर्शित रामायण या मालिकेने अशा लोकप्रियतेचा जणू नवीन उच्चांक प्रस्थापित केला. रविवार 25 जानेवारी 1987 रोजी प्रत्येक रविवारी सकाळी नऊ वाजता 35 मिनिटांची ही मालिका दूरदर्शन वाहिनीवर प्रक्षेपित व्हायला सुरुवात झाली आणि पहिल्याच भागापासून प्रेक्षकांच्या मनाची खरं तर भक्तांच्या मनाची पकड घेण्यास सुरुवात केली. आपल्या देशात रंगीत दूरदर्शन 1982 साली आले म्हणजेच ते येऊन एव्हाना पाचच वर्ष झाली होती. अनेक घरांत अजूनही ब्लॅक अँड व्हाईट दूरचित्रवाणी संच होता (त्याचे आगमन 1972 साली झाले होते) इतकेच नव्हे तर अजूनही घरोघरी टीव्ही पसरला नव्हता. त्यामुळेच ज्याच्या घरी दूरचित्रवाणी संच त्यांच्याकडे रविवारी सकाळी जणू एक प्रकारची छोटी जत्राच असे. ग्रामीण भागात तर कुठे देवळाच्या परिसरातील मोकळ्या जागेत अथवा पडवीतील जागेत टीव्हीची व्यवस्था असे आणि अनेक जण एकत्रितपणे रामायण मालिकेशी एकरुप होत, रममाण होत आणि त्यावेळी देशभरात सर्वत्र रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असे. एकाच वेळेस सर्व घरात ’रामायण’ मालिका पाहिली जात असल्याने वातावरणात पवित्रता जाणवे. या वेळेत कुठेही सोसायटीची सभा म्हणा, राजकीय बैठक म्हणा, इतकेच नव्हे तर साखरपुडा, लग्न वा बारसे असं काहीही केले जात नसे. सगळेच प्राधान्य रामायण मालिका पाह्यला. अतिशय भक्तिभावानेे ही मालिका पाहिली जाई. 78 रविवारनंतर ही मालिका 31 जुलै 1988 रोजी पूर्ण झाली आणि मग बी. आर. चोप्रा निर्मित व दिग्दर्शित ’महाभारत ’ ही मालिका याच वेळेस प्रक्षेपित होऊ लागली आणि त्या मालिकेलाही अगदी अस्साच भन्नाट प्रतिसाद मिळाला आणि जनसामान्यांनी दिलेल्या प्रतिसादाची त्या काळात माध्यमातून मोठ्याच प्रमाणावर दखल घेतली गेली तशीच ती आजही दखल घेतली जाते. ’रामायण’ मालिकेतील रामाची भूमिका साकारणारा अरुण गोविल आणि सीताची भूमिका साकारणारी दीपिका चिखलीया या मालिकेच्या अभूतपूर्व यशाने स्टार झाले. या रुपातच त्यांनी विविध कार्यक्रमात सहभागी व्हावे असाही आग्रह वाढला. दोघांनाही आयुष्यभरचे यश आणि ओळख मिळाली. आजही राम मंदिर प्रतिष्ठापनानिमित्त या दोघांनीही रामायण मालिकेच्या दिवसांच्या आठवणीवर अनेक मुलाखती दिल्या आणि सर्वसामान्यांना जुन्या आठवणीत नेले. नवीन पिढीला ही मालिका यू ट्यूबवर पाहण्यास प्रेरित केले. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष देखरल रामायण दर्शनच, पण त्यावरचा व्हीएफएक्सचा अवाजवी वापर हास्यास्पद ठरला, मूळ आशय आणि भावनांना मारक ठरला. त्यामुळेच फर्स्ट शोपासूनच रसिकांनी त्याची हुर्यो उडवली. रामायण हा भारतीय जनसामान्यांच्या भावनांशी जोडलेला विषय. त्याची जाणीव न ठेवता हा चित्रपट जणू कॉम्प्युटर गेम झाला आणि त्याच पुरते हंसे झाले आणि या महाखर्चिक कलाकृतीला पूर्णपणे नाकारले गेले. सोशल मीडियावर या चित्रपटाची हुर्यो उडवली गेली. पौराणिक चित्रपट असो वा मालिकांना जनसामान्यांकडून अनेकदा तरी उत्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. त्याचीच जणू ही झलक. आपल्या देशातील चित्रपट प्रेक्षक संस्कृतीतील अशा अनेक गोष्टी काहींना कदाचित भाबड्या वाटतील पण रुपेरी पडद्यावरचे देवदर्शन आपलसं मानण्यातही भावनिक आनंद घेणार्‍या प्रेक्षकांच्या भावना जास्त कौतुकाच्या आहेत.

– दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply