Breaking News

रेल्वेच्या पळसदरी तलावात मगर आणि कासवाचा मृत्यू

विषबाधा झाल्याचा संशय; आणखी मगरी असल्याची माहिती

कर्जत : बातमीदार

तालुक्यातील पळसदरी येथे असलेल्या रेल्वेच्या तलावात मंगळवारी (दि. 11) सायंकाळी मगर आणि कासव यांचे मृतदेह आढळले. वन विभागाने मृत मगरीचे अवशेष जाळून टाकले. दरम्यान, त्या तलावात आणखी तीन मगरी असल्याचे स्थानिक आदिवासींचे म्हणणे आहे. त्यामुळे त्या मगरी शोधण्याचे काम वन विभागाने सुरू केले आहे, मात्र मगरींच्या वावरामुळे स्थानिक आदिवासींमध्ये घबराट पसरली आहे.

कर्जतजवळ असलेल्या पळसदरी रेल्वेस्थानकाच्या वरच्या बाजूला 1950च्या दशकात मध्य रेल्वेने पाणी साठवण करण्यासाठी तलाव बांधला होता. 1998 पासून या तलावातील पाण्याचा वापर होत नव्हता. त्यामुळे या तलावात मे महिन्यातदेखील भरपूर पाणी असते. या तलावातील पाण्यात मंगळवारी सायंकाळी एक मगर आणि एक कासव हे मृतावस्थेत आढळले. त्याची माहिती पळसदरी संयुक्त वन व्यवस्थापन समितीकडून मिळताच कर्जतचे वनक्षेत्रपाल निलेश भुजबळ आणि वनपाल संजय तांबे, वनरक्षक नागरगोजे, गांगुर्डे हे रात्री तलावाजवळ पोहचले. त्यांनी पाण्यात मृतावस्थेत असलेल्या मगरीचे अवशेष बाहेर काढले आणि बुधवारी सकाळी त्या मगरीचे सर्व अवशेष जाळून नष्ट करण्यात आले. साधारण चार फूट लांबीची मगर साधारण दीड वर्षे वयाची असल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.

 स्थानिक आदिवासींच्या म्हणण्यानुसार आणखी काही मगरी यापूर्वी दिसून आल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने त्या अन्य मगरींची शोधमोहीम सुरू केली आहे. त्या मगरींना पकडण्यासाठी वन विभागाने जाळे घेतले असून ज्या ठिकाणी मगरींचे वास्तव्य आढळून आले आहे, त्या ठिकाणी वन विभागाने सापळे लावून ठेवले आहेत.

मात्र स्थानिक आदिवासी लोकांच्या बोलण्यावरून या मगरी कोणीतरी आणून सोडल्या असून, मासे मारण्यासाठी तलावात  कीटकनाशक टाकल्यामुळे मगरीचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, मात्र मृत मगर सडलेल्या अवस्थेत असल्याने आणि मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असल्याने मगर जाळून टाकण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे विषबाधा नक्की कधी झाली, याचा शोध लावता आला नाही.

Check Also

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते वाजे येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील वाजे येथे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ग्रामविकास निधीमधून नव्याने बांधण्यात …

Leave a Reply