पनवेल : वार्ताहर
पनवेल परिसरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताची घटना घडली असून यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुणे-मुंबई लेनवर बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून भरधाव टाटा टेम्पोने धडक दिल्याने टेम्पोमधील प्रवाश्याचा यांचा जागीच मृत्यू झाला. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून टेम्पोचालकाने रस्त्याच्या बाजूला बंद पडलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत टेम्पोमधील प्रवासी विजय पवार (रा.खांदा पनवेल) याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टाटा टेम्पोचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
दुसर्या घटनेत पनवेल तालुक्यातील बोनशेत येथे गाडी मागे घेत असताना ती कलंडून अपघात झाला आहे. पनवेल तालुक्यातील बोनशेत बसस्टॉपवर पैसे सुट्टे घेण्यासाठी कारमधून ज्येष्ठ नागरिक खाली उतरले. मात्र टपरी चालकाकडे सुट्टे नसल्याने ते पुन्हा येऊन गाडी चालू करून मागे घेत असताना गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी बोनशेत स्टॉप वरील नाल्याजवळ कलंडली. कारमधील ज्येष्ठ नागरिक त्वरित खाली उतरल्याने मोठा अपघात टळला असून गाडीचे नुकसान झाले आहे.
तिसर्या घटनेत पनवेलजवळील लोहोप वरून पनवेलकडे प्रवाशांना घेऊन निघालेली एसटी बस ठोंबरेवाडी जवळ आज सकाळच्या सुमारास कलंडली. बस चालवीत असताना बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने बसचालकाने बसचा वेग कमी केला मात्र पहाटेच्या वेळी पडलेल्या पावसामुळे रस्ता चिकट झाल्याने बस सरकून रस्त्यालगतच्या खड्ड्यात कलंडली. या अपघातात बस मधील कोणत्याही प्रवाश्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. यावेळी अत्यावश्यक मार्गिकेतुन बसमध्ये अडकलेल्या प्रवाश्यांना परिसरातील नागिरकांनी मदतीचा हात देत सुखरुपणे बाहेर काढले. या बसमध्ये साधारणपणे 50 हुन अधिक प्रवाशी बस मधून प्रवास करीत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.