Breaking News

भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात शासनाची सकारात्मक भूमिका

न्हावाशेवा टप्पा 3मधील पाईपलाईन बदलण्याच्या कामाला गती देणार -मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई ः रामप्रहर वृत्त
भोकरपाडास्थित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात बोर्ड मिटिंगमध्ये विषय घेणार असून कामगारांना न्याय देण्याचे आश्वासन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत न्हावाशेवा टप्पा 3 नुसार जुन्या पाईपलाईन बदलीच्या कामाला वेग आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचार्‍यांच्या मागण्यांसंदर्भात आमदार महेश बालदी यांच्या मागणीनुसार, तर न्हावाशेवा टप्पा 3 नुसार जीर्ण पाईपलाईन लवकरात लवकर बदली करण्याच्या कामाला वेग देण्याच्या आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार मंगळवारी (दि.30) मंत्रालयात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
या बैठकीस आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, संबंधित विभागाचे अधिकारी, कामगार नेते जितेंद्र घरत, युवा नेते देविदास पाटील, गणेश आगिवले, महेंद्र पाटील, संभाजी पाटील आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र पनवेल तालुक्यातील भोकरपाडा येथे असून या केंद्रात गेल्या 30 वर्षांपासून वेगवेगळ्या पदांवर अनेक कर्मचारी काम करीत आहे. या कामगारांना पगारवाढ तसेच सरकारी नियमानुसार सुट्ट्या व इतर सुविधा दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी कामगारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मागणी आणि पाठपुरावा कायम ठेवला आहे. याबाबत उच्च न्यायालयाने सन 2007मध्ये निकाल दिला असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व कामगार मंत्रालय यांनी सहा महिन्यांत निर्णय घेऊन त्यांची देणी अदा करावीत, असे आदेश दिले होते, पण महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने कोणतीही कार्यवाही केली नाही. याबाबत 22 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत बैठक होऊन कामगारांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या, मात्र मुख्य मागण्या अद्याप पूर्ण झाल्या नाहीत. त्या अनुषंगाने मंगळवारी मंत्रीमहोदय, संबंधित विभागाचे अधिकारी व कामगार प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक झाली.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी कामगारांच्या व्यथा मांडताना तातडीने कार्यवाही करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी या कामगारांच्या पगारवाढीसंदर्भात तसेच सुट्ट्यांबाबत बोर्ड मिटिंगमध्ये विषय घेणार असून चतुर्थ श्रेणी कामगारांप्रमाणे पगारवाढ करण्याचे आश्वासन दिले तसेच सकारात्मक भूमिका घेत या संदर्भात प्रयत्नशील राहून कामगारांना न्याय देण्याचे आणि सर्वतोपरी सहकार्य आश्वासन दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचा महत्त्वाचा भाग असलेल्या न्हावाशेवा टप्पा 3च्या कामानंतर पनवेल व उरण परिसरातील पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार आहे. वाढते नागरीकरण आणि पाण्याची आवश्यकता लक्षात घेता या योजनेतील जुन्या पाईपलाईन बदलीच्या कामाला वेग येण्याची गरज असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यानुसार ठेकेदाराला हे काम फास्ट ट्रॅकवर करण्याचे आदेश देण्याचे मंत्रीमहोदयांनी आश्वासित केले.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply