नागोठणे : प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महिने एसटीची वाहतूक महिने बंद होती. गणपतीच्या सणानंतर वाहतूक काही अंशी चालू झाल्यानंतर मुंबई, कल्याण, पुणे बाजूकडे जाणार्या गाड्या चालू झाल्या होत्या. आता पन्नास टक्क्यांच्या आसपास गाड्या पूर्ववत चालू झाल्या असून शाळा, महाविद्यालय चालू झाल्यानंतर गाड्यांचे संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होईल असे नागोठणे येथील एसटी वाहतूक नियंत्रक चंद्रकांत भोईर आणि भालचंद्र शेवाळे यांनी सांगितले. नागोठणे बसस्थानकातील उपहारगृहसुध्दा चालू करण्यात आले आहे. गोरेगाव आणि रामवाडी बसस्थानकातील उपहारगृहे अद्याप बंद असल्याने नागोठणे स्थानकात न येता महामार्गावरून परस्पर जाणार्या मंडणगड, दापोली, खेड, गुहागर आगाराच्या एसटी बसेस उपहारगृह असल्याने नागोठणे बसस्थानकात यायला सुरुवात झाली आहे. दिवसभरात मुंबई, बोरिवली, ठाणे, कल्याण,डोंबिवली, नाशिक, नालासोपारा तसेच खेड, चिपळूण, गुहागर, मंडणगड बाजूकडे जाणार्या 30 ते 40 बसेस नागोठण्यात येत आहेत. या वाढीव गाड्यांमुळे येथील प्रवाशांचा फायदा होत आहे.