पोलादपूर तालुक्यात भातशेतीची कापणी सुरू झाली असताना विंचूदंशाने बाधित रूग्णांची संख्या वाढली असून पावसाळयापूवीर अनेक रूग्ण ग्रामीण रूग्णालयामध्ये होत असतात. दरम्यान, महाड येथील जागतिक किर्तीचे विंचूदंश उपचारपध्दतीचे संशोधक डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी दिलेल्या सूचनांचे पोलादपूरच्या ग्रामीण भागात पालन होण्याची गरज निर्माण झाली आहे.
पोलादपूर तालुक्यात कार्तिकी एकादशीपूर्वीच भातशेती कापणीला सुरूवात झाली की ऑक्टोबर हिटमध्ये विंचवाच्या माद्यांनी पाठीवर पिल्ले घेऊन वावर सुरू करतात. आता उन्हाळयात ही पिले विंचवाच्या माद्यांपासून विभक्त होऊन मुक्त संचार करू लागली असल्याने विंचूदंशाचे प्रमाण वाढीस लागल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांनी भातकापणीनंतर शेतात वाळण्यासाठी ठेवलेल्या भाताच्या भार्याखाली गारव्यास आलेल्या या विंचवांनी भारे उचलून माच बांधणार्या शेतकर्यांना दंश करण्यास सुरूवात केली आहे. यामुळे विंचूदंशबाधित रूग्णांची संख्या वाढीस लागली आहे. अनेकदा शेतात रचलेल्या या भाताच्या भार्याखाली सापांचाही वावर झाल्याने शेतकर्यांना सापाने चाटले अशी भावना निर्माण होऊन कोणत्या सापाने चाटले अथवा दंश केला हे समजून येत नसल्याने उपचारादरम्यान अडथळे वाढत आहेत. नोव्हेंबर महिना सुरू झाल्यापासून विंचूदंशाचे व अन्य विषारी दंशाचे रूग्ण ग्रामीण रूग्णालयात दाखल होतात. मात्र, पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू करण्याऐवजी महाड आणि माणगावकडे पाठविले जात असल्याने बहुतांशी वाहनातच दगावतात, असे दिसून आले आहे.
पोलादपूर तालुक्यातील वास्तव्यामध्ये जागतिक किर्तीचे विंचूदंश उपचारपध्दतीचे संशोधक डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी, घरात जमिनीवर अंथरूण टाकून झोपणार्यांना सर्पदंश झाल्याच्या घटनांचे प्रमाण अधिक असल्याचे संशोधनांती सिध्द करणारे डॉ.बावस्कर यांना ही झोपण्याची सर्वमान्य पध्दत सहजपणे मृत्यूचे कारण ठरू शकत असल्याचे दिसून आल्याने त्यांनी बॅनर्स लावून पलंगाचा वापर झोपण्यासाठी करण्याचे आवाहन केले आहे.
उंदीर अन् बेडूक यांचा घरामध्ये प्रवेश झाल्यानंतर या भक्ष्यांच्या शोधात काही विषारी साप घरात शिरकाव करतात आणि जमिनीवर अंथरूण टाकून झोपणार्यांना दंश करतात, असे अनेक सर्पदंशाच्या घटनांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे झोपण्यासाठी पलंगाचा वापर केल्यास सर्पदंश टाळता येईल, असे डॉ.हिंमतराव बावस्करांनी आवाहन केले आहे. ’बॅरिस्टरचं कार्ट’ या आत्मचरित्रामध्ये डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी महाड अन् पोलादपूर तालुक्यांचे यथार्थ चित्रण करताना त्यांच्या वैद्यकीय सेवेची सेवाभावी वृत्तीही शब्दांकित केली आहे. लॅन्सेट या जागतिक संस्थेने त्यांचा विंचू व सर्प दंश उपचारपध्दतीवरील शोधनिबंध स्विकारला असून ग्रामीण भागातील मृत्यूदर घटविण्यासाठी सर्प-विंचू दंश उपचारपध्दतीचे तसेच डॉ.बावस्कर यांनी शोधलेल्या औषधांची निर्मिती मोठया प्रमाणात होण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे.
सूर्यकांडर आणि कोब्रादंशाचे प्रकार शेतात काम करणार्यांना नेहमीचेच असल्याचे डॉ.बावस्कर यांनी 1978 साली लॅन्सेटमध्ये नमूद केले असून भातशेती कापणीनंतर सर्प व विंचू यांची बिळे बुजल्याने ते घर, वाडया, गटारे आणि अडगळीच्या ठिकाणी आश्रय घेतात. परिणामी, सर्पदंशाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने पोलादपूरसह कोकणातील ग्रामीण रूग्णालयामध्ये व्हेंटीलेटर्स व अम्बुबॅग्जसारखी कृत्रिम श्वसनक्रिया देणारी यंत्रणा उपलब्ध करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप सरकारमार्फत या अत्यावश्यक गरजांकडे गांभिर्याने लक्ष दिले जात नसल्याने डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी बावस्कर हॉस्पिटल ऍण्ड रिसर्च सेंटरमध्ये या सुविधा उपलब्ध करून रूग्णांचे प्राण वाचविण्याचे अनेक प्रयत्न यशस्वी केले आहेत.
डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी रायगड जिल्ह्यातील महाड व पोलादपूर तालुक्यांसह अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच ग्रामीण रूग्णालयांमध्ये ’मच्छरदाणी व पलंगाचा वापर करा;मलेरिया, हत्तीरोग, डेंग्यू, चिकून गुनिया आणि मेंदूज्वर अशा अनेक रोगांपासून तसेच मणेर सर्पदंशामुळे होणार्या मृत्यूपासून वाचवा’ असे बॅनर चित्रांसह लावले आहेत.
सध्या ऊन-पावसांमुळे काही मच्छर आणि किटक घरात शिरकाव करतात. सायंकाळी मच्छर चावण्याचे प्रमाण अधिक असल्याने नेमके झोपेदरम्यान मच्छरांच्या चाव्यांकडे दूर्लक्ष होऊन मच्छरांपासून उद्भवणारे विविध रोग फैलावतात. यामध्ये मलेरिया, हत्तीरोग, डेंग्यू, चिकून गुनिया आणि मेंदूज्वर अशा अनेक रोगांचा फैलाव होण्यापूर्वीच उपचार व दक्षता घेण्याची गरज डॉ.हिंमतराव बावस्कर यांनी व्यक्त केली आहे. मात्र, डॉ.बावस्कर यांच्या सूचनांचे ग्रामीण भागात सर्वत्र पालन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. यासंदर्भात जनजागृती करण्याकडे सामाजिक कार्यकर्त्याना विशेष लक्ष देण्याची गरज आहे. पोलादपूर तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून विंचूदंशाच्या घटना जीवघेण्या ठरत असल्याची बाब लक्षात घेऊन पोलादपूर ग्रामीण रूग्णालयामध्ये सेवा केलेले जागतिक दर्जाचे विंचूदंशतज्ज्ञ डॉ.हिम्मतराव बावस्कर यांनी निर्माण केलेल्या उपचार पध्दतीला लॅन्सेंटमध्ये गौरविण्यात आले होते. मात्र, आजही अशाप्रकारचे विंचूदंशाने मृत्यू होण्यास सरकारी दवाखाने कारणीभूत ठरत असल्यास या मृत्यूंची जबाबदारी राज्यसरकारने घ्यावी, अशी मागणी पोलादपूरकरांकडून होत आहे.
-शैलेश पालकर