शेकापचे जीवन गावंड समर्थकांसह भाजपमध्ये दाखल
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
रायगड जिल्ह्याला सुमारे 240 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून हा सुंदर परिसर मन मोहून टाकतो. अटल सेतूमुळे मुंबई जवळ हा परिसर आला आहे. येथील जमिनींना मोठा भाव येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी केले. ते उरण तालुक्यातील पिरकोन येथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
उरणचे आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नातून डीपी वर्ल्डच्या सीआरएस फंडातून सुमारे सात कोटी रुपये खर्च करून खोपटे गावात उभारण्यात आलेल्या शाळांच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा आणि विविध विकासकामांचे भूमिपूजन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.16) पिरकोन येथे झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी शेकापचे माजी जि.प सदस्य जीवन गावंड व कलावती गावंड यांनी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करण्यात आले.
या समारंभास भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख तथा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उरण तालुकाध्यक्ष रविशेठ भोईर, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत घरत, उरण शहर अध्यक्ष व माजी नगरसेवक कौशिक शाह, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, जि.प.चे माजी सदस्य विजय भोईर, ज्ञानेश्वर घरत, पिरकोनच्या सरपंच कलावती पाटील, बांधपाडा सरपंच विशाखा प्रशांत ठाकूर, भाजप तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, माजी अध्यक्ष हेमंत म्हात्रे, कुलदीप नाईक, समीर मढवी, कामगार नेते जितेंद्र घरत, केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, संदीप पाटील, विलास पाटील, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, सुशांत पाटील, उद्योजक व्ही.एस. पाटील, माजी उपनगराध्यक्ष जयवीन कोळी, करंजा मच्छीमार सोसायटीचे चेअरमन प्रदीप नाखवा यांच्यासह आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मंत्री गिरीश महाजन यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्याचे कौतुक करताना म्हटले की, जनतेची कामे कशी करून घ्यावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे आमदार महेश बालदी. ते माझ्याकडून विकासकामांसाठी पाठपुरावा करून निधी घेऊन गेले. मी सहा वेळा आमदार झालो. मंत्री आहे. सातव्यांदा आमदार होईन हे कशामुळे शक्य आहे, तर विधायक काम केल्याने, लोक जोडल्याने. आमदार महेश बालदी हेही असेच काम करीत आहेत याचा मला अभिमान आहे.
या वेळी आमदार महेश बालदी यांनी शेकापवर हल्लाबोल केला. विकास न करता शेकापने भांडणे लावण्याचे काम केले. त्यामुळे हा भाग मागास राहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश बदलत असून या भागाचा झपाट्याने विकास करणे मी माझे कर्तव्य समजतो. टीका करणार्यांवर आपण टीका करायची नाही. आपण आपल्या कामाने टिकेला उत्तर द्यायचे, कारण जनतेला विकास हवा आहे, टीका नाही, असेही ते म्हणाले.
आमदार प्रशांत ठाकूर, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही विचार मांडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्यांचा विश्वास सार्थ ठरवू, असे सांगितले, तर जीवन गावंड यांनी आपण परिसराच्या विकासासाठी भाजपच्या राष्ट्रीय प्रवाहात सहभागी झालो असल्याचे स्पष्ट केले.
भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांना या कार्यक्रमात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आमदार महेश बालदी यांच्या प्रयत्नाने खोपटे फाटा ते बंदर रस्ता डांबरीकरण व काँक्रीटीकरण, कोप्रोली स्मशानभूमी ते प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत रस्ता डांबरीकरण, मुख्यमंत्री पेयजल योजेंतर्गत पाईपलाईन व पाण्याची टाकी बांधणे, पाणदिवे दत्तमंदिर सामाजिक सभागृह बांधणे, सारडे येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे, पुनाडे आदिवासी रस्ता तयार करणे, आवरे ग्रामपंचायत येथील तलाव सुशोभीकरण करणे, पिरकोन ग्रामपंचायत येथील अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे, बौद्धवस्तीमध्ये सामाजिक सभागृह बांधणे, सामाजिक सभागृह बांधणे अशी कामे मार्गी लागली आहेत. याबद्दल नागरिकांनी आभार मानले.