Breaking News

रणधीर कपूर धसमुसळ्या नायक, हुशार दिग्दर्शक

रणधीर कपूरला एक पिढी पृथ्वीराज कपूरचा नातू, राज कपूरचा मोठा मुलगा, शम्मी कपूर व शशी कपूरचा पुतण्या, बबिताचा नवरा, ऋषि कपूर व राजीव कपूरचा मोठा भाऊ अशा नातेसंबंधाने ओळखत असे. नव्वदच्या दशकातील चित्रपट रसिक बेबो (करिश्मा कपूर) व लोलो (करिना कपूर) यांचे पिता म्हणून ओळखू लागली. मग सैफ अली खानचे सासरे ही त्याची ओळख झाली. आजची डिजिटल पिढी रणधीर कपूरला तैमूरचे आजोबा म्हणून ओळखते…
आज रणधीर कपूर याच कपूर खानदानाचा कुटुंब प्रमुख आहे. अनेक सुखदुःख पचवत पचवत 15 फेब्रुवारी रोजी वयाचा 77वा वाढदिवस साजरा केला. शुभेच्छा! वडिलोपार्जित अशा चेंबूर येथील आर.के. स्टुडिओ या भव्य दिमाखदार वास्तूची विक्री आणि मग पाडाव, लहान सख्ख्या भावांच्या मृत्यूचा आघात, चेंबूर येथील आपल्या मागील पिढीपासूनच्या आर.के. कॉटेज या प्रशस्त घर वास्तूची विक्री आणि मग त्याचाही पाडाव असे अनेक धक्के पचवत रणधीर कपूरची वाटचाल सुरू आहे.
अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक हे त्याचे हिंदी चित्रपटसृष्टीतील रूप. राज कपूरचा मुलगा म्हणून तो लहानपणापासून फार लाडात, श्रीमंतीत वाढला. याबाबतच्या कथा दंतकथा काहीही असू देत. खुद्द रणधीर कपूरने (ज्याला कुटुंबात व चित्रपटसृष्टीत डब्बू कपूर म्हणतात) आपल्या एका मुलाखतीत म्हटलंय, लहानपणापासून शाळेत बेस्ट बसने जायचो यायचो. सरकारी वाहनाने त्याने त्या काळात वाटचाल केली. विशेषतः झुक गया आसमान या चित्रपटाच्या वेळेस दिग्दर्शक लेख टंडन यांच्याकडे चौथ्या क्रमांकाचा सहाय्यक दिग्दर्शक असताना चेंबूरपासून मुंबईतील अनेक स्टुडिओत बेस्ट बसने प्रवास केला. याचं कारण जनसामान्यांच्या जगण्याची कल्पना यावी आणि राज कपूरचा मुलगा म्हणून आपण कोणतेही शौक करू अशी भावना नको. लेख टंडन यांच्याकडे सहाय्यक दिग्दर्शक म्हणून वाटचाल करताना चित्रपटसृष्टी आणि चित्रपट माध्यमाचा त्याने बराच अनुभव घेत घेत स्वतःची जडणघडण केली आणि मग जीत या चित्रपटातून नायक म्हणून कारकीर्द सुरू केली. पहिलीच नायिका बबिता. तीच कालांतराने त्याची पत्नी झाली.
रणधीर कपूरच्या कारकिर्दीतील एक सुपर हिट चित्रपट मनमोहन देसाई दिग्दर्शित रामपूर का लक्ष्मण. आता दिग्दर्शक मनमोहन देसाईंचा ’पिक्चर’ पाह्यला गेल्यावर तिकीट काढताक्षणीच तिकीट खिडकीवर आपला ’मेंदू’ जमा करावा, डिपॉझिट करावा तर आणि तरच पडद्यावर जे जे काही चाललंय याचा मनसोक्त, मनोरंजन होईल. तसे न करता का, कसे, कशाला, केव्हा असे प्रश्न करीत बसलात, तर आनंदाला मुकाल या माझ्या मताशी फिल्म दीवाने नक्कीच सहमत होतील. (रूपेरी पडद्यावरील मनजींच्या मनोरंजनाला ’पिक्चर’ हाच शब्द योग्य आहे. तळागाळातील लोकांपर्यंत त्यांचे पिक्चर पाहिले गेले.)
अशा मनजींच्या रामपूर का लक्ष्मण या चित्रपटाने मुंबईत शालिमारमध्ये खणखणीत रौप्य महोत्सवी यश संपादले. या पिक्चरमधील काही मारधाड दृश्ये याच शालिमार थिएटरच्या कार पार्किंगमध्ये चित्रीत करण्यात आली याचे त्या काळात विशेष वाटायचे.
त्या काळात अशा सर्व प्रकारचा मसाला मिक्स असलेले पिक्चर भारी चालत. मनजी म्हटलं की हरवले गवसले हे हुकमी मध्यवर्ती सूत्र. म्हणजे पिक्चरच्या पहिल्याच रिळात लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या प्रवासात हरवणे. पिता आणि एक मुलगा एकीकडे, आई दुसरीकडे तर दुसरा मुलगा तिसरीकडे असा प्रकार. एका मुलाचे नाव राम (मोठेपणी तो शत्रुघ्न सिन्हा होतो.) त्याचा भाऊ लक्ष्मण (अर्थात तो रणधीर कपूर होतो.) राम मुंबईत वाढतो, तर लक्ष्मण रामपूर गावात लहानाचा मोठा होतो आणि मग मुंबईत येतो. येथे त्याची भेट श्रीमंत घरातील रेखा चौधरी (अर्थात रेखा) हिच्याशी होते. ती लक्ष्मणच्या सरळ स्वभाव आणि साधेपणावर फिदा होते. (हे त्या काळातील पिक्चरमध्ये हमखास घडायचे. ते पाहून माझ्यावर असा परिणाम झाला की मोठेपणी आपणही असेच साधे सरळ राहावे, एखादी रेखा भेटेल असे वाटले, पण मी मोठा होईपर्यंत परिस्थितीत बदल झाला.) या पिक्चरमध्ये खूनाचा आळ, समज, गैरसमज, योगायोग वगैरे वगैरे लहान मोठ्या गोष्टी खूप घडतात. का घडतात हे विचारायचे नाही. तसा प्रश्न पडेपर्यंत पिक्चर पुढे जातो आणि तेच तर महत्त्वाचे आहे. मनजींच्या पिक्चरमधून हेच तर अपेक्षित असते. त्यातच मनमोहन कृष्ण पित्याच्या तर सुलोचनादीदी आईच्या भूमिकेत ही निवड अगदी परफेक्ट. दोन्ही व्यक्तीरेखा भरपूर सहानुभूती मिळवतात. इतर भूमिकेत रणजीत, रूपेशकुमार, तिवारी, पद्मा खन्ना, रमेश देव, विजू खोटे, केशव राणा वगैरे वगैरे. मनमोहन देसाईंच्या चित्रपटात सर्व प्रकारच्या व्यक्तीरेखा हमखास असत. रणधीर कपूर, रेखा, शत्रुघ्न सिन्हा आणि रणजीत या चौघांच्याही कारकिर्दीचा हा अगदीच सुरुवातीचा काळ होता. हे आज पिक्चर एन्जॉय करताना लक्षात येईल. रणधीर कपूरवर शम्मी कपूरचा प्रभाव जाणवतो. (तो कायमच जाणवत राहिला) रेखा नेहमीच गॉसिप्स मॅगझिनमधून थेट या चित्रपटाच्या सेटवर आली असे दिसते. शत्रुघ्न सिन्हा बोलण्यात दिसण्यात जास्त ओव्हर स्टाईलीश वाटतो. प्रत्येकाचे तोपर्यंत तीन चार चित्रपट झाले असतील. मनजींकडे तोपर्यंत दशकभरचा अनुभव होता. मजरूह सुल्तानपुरी यांच्या गीताना राहुल देव बर्मनचे संगीत. एकूण सातपैकी तीन गाणी आजही लोकप्रिय आहेत. गुम है किसी के प्यार मे (पाश्वगायक लता मंगेशकर आणि किशोर कुमार), प्यार का समय है जहा (लता मंगेशकर आणि किशोर कुमार), रामपूर का बासी हू मै (किशोर कुमार) ही गाणी कितीही वेळा ऐकावीत, पहावीत जराही कंटाळा येत नाही तर मग आणखी काय हवे? रणधीर कपूर या तीनही गाण्यात मस्तच खुललाय. राज कपूरकडे असलेला चित्रपट गीत संगीताचा सेन्स रणधीर कपूरमध्येही आला.
पिक्चर हिट झाल्यावर रणधीर कपूरकडे अशाच भाबड्या ग्रामीण नायकाच्या भूमिका मोठ्याच प्रमाणावर आल्या. प्रयाग राज दिग्दर्शित ’पोंगा पंडित’मध्ये त्याने ती साकारली. याच साच्याच्या भूमिकेने आपलं कलाकार म्हणून बरेच नुकसान झाले ही रणधीर कपूरची भावना.
फर्स्ट रननंतर मॅटीनी शोला माझ्यासारख्या फिल्म दिवान्याने हा पिक्चर पुन्हा पुन्हा एन्जॉय केला. ’रामपूर का लक्ष्मण’ पन्नाशीपार कधी झाला हे समजलेच नाही हेच मोठे यश.
रणधीर कपूरने आपल्या अभिनयाची सुरुवात श्री 420 चित्रपटात बालकलाकार म्हणून केली. 1971च्या ‘कल आज और कल’च्या वेळेस रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रातदेखील पाऊल ठेवले. त्या काळात या गोष्टीचे विशेष कौतुक झाले. चित्रपटात पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता आणि बबिता नायिका होती. तिला दिग्दर्शन करता करता रणधीर कपूरच्या तिच्या प्रेमात कसा पडला हे त्यालाही समजले नाही आणि तिने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हे लग्न अतिशय थाटामाटात झाले.
रणधीर कपूरने धरम करम (1976) आणि हीना (1991) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ’धरम करम’च्या सेटवरील रेखाच्या मोकळ्या वागण्याचे किस्से गॉसिप्स मुख्य रंगवून खुलवून आले. ’हीना’ राज कपूरचे दीर्घकालीन स्वप्न होते. दोन गाण्यांच्या ध्वनिमुद्रणानंतर राज कपूरचे निधन झाल्यानंतर रणधीर कपूरने हे आव्हान स्वीकारून यशस्वी केली. ऋषि कपूर व झेबा बख्तियार यांच्यासह अश्विनी भावेला अतिशय उत्तम संधी मिळाली. कपूर बंधूंशी तिचे कायमस्वरूपी चांगलेच संबंध निर्माण झाले.
सत्तर ऐंशीच्या दशकात रणधीर कपूरने जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार, कस्मे वादे इत्यादी चित्रपटातून भूमिका साकारल्या. रोझ मुव्हीज या चित्रपट निर्मिती संस्थेचे निर्माता व दिग्दर्शक रमेश बहेल यांच्याशी ’जवानी दीवानी’पासूनच रणधीर कपूरची खास मैत्री. त्यातील गाणी आजही लोकप्रिय.
’सामने ये कौन आया दिल में हुई हलचल’ (पार्श्वगायक किशोरकुमार), ’नही नहीं कभी नहीं करो थोडा इंतजार’ (आशा भोसले आणि किशोरकुमार), ’अगर साज छेडा तो तराने बनेंगे’ (आशा भोसले आणि किशोरकुमार), जा ने जा ढूंढता मै यहाँ (आशा भोसले आणि किशोरकुमार), यह जवानी है दीवानी (किशोरकुमार) रमेश बहेल निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन नरेन्द्र बेदी यांचे आहे, तर गाणी आनंद बक्षी यांची असून तरुण संगीत राहुल देव बर्मनचे आहे. ’जवानी दीवानी’ने मुंबईत जमुनामध्ये रौप्यमहोत्सवी यश संपादले. आणि सत्तरच्या दशकात मॅटीनी शो आणि रिपीट रनला ’जवानी दीवानी’ पुन्हा पुन्हा थिएटरमध्ये आला तेव्हा त्याची गाणी मुख्य आकर्षण होते.
’जवानी दीवानी’ म्हणजे म्युझिकल हिट प्रेमपट. नावातच सगळे काही आले. विशेष म्हणजे रणधीर कपूर आणि जया भादुरी अशी यात रोमॅन्टीक जोडी. वेगळी वाटते ना? (तोपर्यंत ती जया बच्चन झाली नव्हती.) राजेश खन्नाच्या सुपर स्टार क्रेझने वातावरण ढवळून काढल्याचा तो काळ आणि त्यात आपला चित्रपट यशस्वी ठरणे इतर नायकांनाही महत्त्वाचे होते.
चित्रपटाच्या जगात यश हेच चलनी नाणं असल्याने ते हवेच असते. ’जवानी दीवानी’च्या खणखणीत यशाने ते रणधीर कपूरला दिले. निर्माते रमेश बहेल आणि दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांनी याच जोडीला घेत ’दिल दीवाना’ आणला, पण तो
रसिकांनी नाकारला.
रमेश बहल यांनी काही वर्षांनी चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकले आणि कस्मे वादे (अमिताभ बच्चन, राखी, रणधीर कपूर, नीतू सिंग), हरजाई (रणधीर कपूर आणि टीना मुनिम), पुकार (अमिताभ बच्चन, झीनत अमान, परवीन बाबी, रणधीर कपूर) इत्यादी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. रणधीर कपूर त्यांचा फेव्हरेट होता. ’जवानी दीवानी’पासून त्यांची मैत्री जमली होती…
ऐंशीच्या दशकात रणधीर कपूरने चित्रपटातून भूमिका साकारणे जवळपास थांबवले. कालांतराने सावनकुमार दिग्दर्शित ’मदर’ (1999) या चित्रपटात त्याने आवर्जून भूमिका साकारलीय. रेखासोबत अनेक वर्षांनी काम करण्याचा योग आल्याने तो सुखावल्याचे फिल्मीस्तान स्टुडिओतील या चित्रपटाच्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठी गेलो असता ’लाईव्ह’ अनुभवले. त्याने आपल्या कुटुंबाच्या आर.के. फिल्म बॅनरखालील ’प्रेम रोग’ (1982), राम तेरी गंगा मैली (1985), प्रेम ग्रंथ (1996) आणि ’आ अब लौट चले’ (1999)च्या निर्मितीत मन रमवले.
रणधीर कपूरच्या भेटीची एक विशेष आठवण सांगायलाच हवी. ’हीना’चा मुंबईवरील आम्हा चित्रपट समीक्षकांसाठीचा खेळ आर.के. स्टुडिओतील मिनी थिएटरमध्ये आयोजित केला होता. त्यानंतर खास आर.के. शैलीची झक्कास पार्टीही होती. रणधीर कपूर यजमान म्हणून आम्हा प्रत्येकाला भेटला. गप्पांच्या ओघात तो म्हणाला, माझ्या डॅडीच्या मेरा नाम जोकर चित्रपटाला सगळेच फ्लॉप म्हणतात, पण रिपीट रन, छोट्या पडद्यासाठीचे हक्क यातून या चित्रपटाने अशी काही कमाई केली की, आमच्या आर.के. फिल्म बॅनरखालील तो सर्वाधिक सुपर हिट चित्रपट ठरलाय. रणधीर कपूरचे हे बोल आजही माझ्या कानात घुमताहेत.
रणधीर कपूर राज कपूरचा मोठा मुलगा ही त्याची पहिली ओळख, आज तो कपूर खानदानाचा कुटुंब प्रमुख आहे. एका मोठ्या वर्तुळात रणधीर कपूरचा प्रवास सुरू आहे.
-दिलीप ठाकूर
चित्रपट समीक्षक

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply