Breaking News

नॉव्हेल्टी, एक्सलसियर, न्यू एक्सलसियर

तुम्हालाही कल्पना आहेच आपल्या देशातील अनेक शहरांतील जुनी एकपडदा अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्स ही इंग्रजकालीन आहेत. त्यातील काही आजही सुरू आहेत, काही इतिहासजमा अशी झालीत की त्याच्या मूळ खाणाखुणाही सापडत नाहीत, तर काहींचे काही काळाने नूतनीकरण झाले.
असेच एक दक्षिण मुंबईतील चित्रपटगृह न्यू एक्सलसियर. मुळातील ते नॉव्हेल्टी. ते पाडून त्या जागी एक्सलसियर उभे राहिले. ते 21 फेब्रुवारी 1928 रोजी सुरु झाले. (म्हणजेच त्याला तब्बल 96 वर्ष झालीदेखील) त्यानंतर ते पाडून त्या जागी न्यू एक्सलसियर उभे राहिले. ते 12 मार्च 1975 रोजी राज खोसला निर्मित व दिग्दर्शित प्रेम कहानी या लोकप्रिय संगीतमय चित्रपटाने सुरू झाले. यात शशी कपूर, राजेश खन्ना, मुमताज व विनोद खन्ना यांच्या प्रमुख भूमिका. तळमजल्यावर प्रशस्त वातानुकूलित थिएटर (त्यात बाल्कनी नाही हे त्या काळात विशेष मानले जाई. स्वस्तिक थिएटरमध्येही बाल्कनी नव्हती हे मुंबईतील जुन्या पिढीतील चित्रपट रसिकांना आठवत असेलच) आणि त्यावर प्रशस्त उंच इमारत. त्यात चौथ्या मजल्यावर मिनी थिएटर. उर्वरित इमारतीत विविध कार्यालये.
एक सहज आठवण सांगतो. ऑक्टोबर 1983ची गोष्ट. दिग्दर्शक बी. आर. चोप्रा दिग्दर्शित मजदूर या चित्रपटाच्या प्रेस शोचे आमंत्रण माझ्या हाती आले, त्यावर म्हटले होते, स्थळ न्यू एक्सलसियर मिनी थिएटर. मी मीडियात नवीनच असल्याने मला हा अनुभव नवीन.
लिफ्टने चौथ्या मजल्यावर गेल्यावर साधारण साठ सीटसचे पाहिलेले मिनी थिएटर ही माझी ’टॉकीजची गोष्ट संस्कृती’शी नवीन ओळख झाली. तशी ती होणेही गरजेचे असते. तोपर्यंत हजार/बाराशे/पंधराशे सीटसच्या मोठ्या थिएटर पहिल्या चार रांगात म्हणजेच ’स्टॉलचा पब्लिक’ म्हणून पिक्चर एन्जॉय करणारा असा मी होतो. आता माझ्यात जणू स्थित्यंतर होत होते. मी चित्रपट समीक्षकाच्या भूमिकेत शिरत होतो.
मुंबईबाहेरच्या चित्रपट रसिकांना सांगायचे तर हे न्यू एक्सलसियर थिएटर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून जवळच आहे. अधिक तपशीलात जात सांगायचे तर कॅपिटॉल, स्टर्लिंग, न्यू एम्पायर यांच्या सहवासात न्यू एक्सलसियर. म्हणजेच एका थिएटरला तिकीट मिळाले नाही तर दुसरे थिएटर असा छान पर्याय होता. तरी स्टर्लिंगला कायमच विदेशी चित्रपट आणि न्यू एक्सलसियरलाही अधूनमधून असेच विदेशी चित्रपट प्रदर्शित होत. त्या काळात येथे ’चुपके चुपके’, ’शोले’ रिलीज झाले. ’शोले’चे विशेष म्हणजे संपूर्ण मुंबईत मिनर्व्हासोबत फक्त आणि फक्त न्यू एक्सलसियरला तो सत्तर एमएम आणि स्टीरीओफोनिक साऊंड सिस्टीममध्ये होता, पण ’फक्त काही आठवड्यां’साठीच तो न्यू एक्सलसियरला आहे असे जाहिरातीतच म्हटले होते.
न्यू एक्सलसियरमध्येच ’एक्झॉक्टिक्ट’ हा घाबरवून सोडणारा विदेशी चित्रपट लोकप्रिय ठरला. यशराज फिल्म्सचा आदित्य चोप्रा दिग्दर्शित ’दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ (1995)ने येथेच खणखणीत पन्नास आठवड्यांचा प्रवास केल्याने या थिएटरच्या इतिहासाला महत्त्व प्राप्त झाले. तो 20 ऑक्टोबर 1995 रोजी दिवाळीच्या दिवशी प्रदर्शित झाला आणि येथे पन्नास आठवड्यांचा मुक्काम केल्यावर मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट केल्यावर आजही तो सुरू आहे. या विश्वविक्रमात न्यू एक्सलसियरचाही वाटा.
यशाची हीच तर गंमत आहे. ती अनेक गोष्टींचे संदर्भ, तपशील, माहिती देते. न्यू एक्सलसियरच्या आताच्या भव्य इमारतीच्या जागेवर फार पूर्वी काय होते? इंग्रजांच्या काळात 1887 साली तेथे नॉव्हेल्टी नावाचे नाटकाचे थिएटर होते. कधी जादूचे प्रयोग, वाद्यवृंद वगैरेचे शो होत. मूकपटाच्या काळात त्यांचे आयोजन होऊ लागले. (याचं एक कारण, चित्रपट निर्मितीची संख्या फार नव्हती.) मग ही इमारत पाडून नवीन चित्रपटगृह उभे राहिले. त्याचे नाव एक्सलसियर. काही वर्षातच बोलपट निर्माण होत गेले आणि त्या काळातील जुन्या मुंबईत एक्सलसियर स्थिरावले. (कालांतराने म्हणजेच साठच्या दशकात ग्रॅन्ड रोडच्या पूर्वेला उभे राहिलेल्या नॉव्हेल्टी चित्रपटगृहाशी याचा काहीच संबंध नाही.) नंतर एक्सलसियर पाडून सत्तरच्या दशकात वातानुकूलित देखणे असे 550 सीटसचे पण बाल्कनी नसलेले भव्य दिमाखदार थिएटर सुरू झाले. न्यू एक्सलसियरमध्ये दौड, जुदाई, जब प्यार किसीसे होता है, झूठ बोले कौव्वा कांटे असे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. रमेश सिप्पी दिग्दर्शित ’सागर’, संजय लीला भन्साली दिग्दर्शित ’देवदास’ या बहुचर्चित चित्रपटांनी येथे रौप्य महोत्सवी मुक्काम केला.
चौथ्या मजल्यावर मिनी थिएटर. तेथे अनेक मराठी व हिंदी चित्रपटांचे आम्हा समिक्षकांसाठीचे शो रंगले. त्यात माझ्या काही विशेष आठवणी आहेत, अधूनमधून कोणी स्टार यायचा हो.
आपला पहिला चित्रपट ’अबोध’च्या प्रेस शोच्या मध्यंतराला माधुरी दीक्षित आपल्या आई-बाबांसोबत आवर्जून आली आणि आम्हा समिक्षकांना भेटली. अगदीच शाळकरी मुलगी होती हो ती. मला आठवतंय, त्या काळात चित्रपट समिक्षा लिहिणारे शरद गुर्जर यांची माधुरीच्या आईशी भेट होताच त्यांना त्यांचे जुने दिवस आठवले. रत्नागिरीत लहानपणी ते एकाच शाळेत होते हे विशेष होते. जग फार छोटे आहे म्हणतात ते काही उगीच नाही.
’अंकुश’च्या येथील प्रेस शोला दिग्दर्शक एन. चंद्रा आवर्जून हजर होतेच, शिवाय नाना पाटेकरही आला होता. या चित्रपटाच्या पूर्वप्रसिद्धीवर एन. चंद्रांचे विशेष लक्ष होते हे आठवतेय. अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत आपला चित्रपट पोहचवण्यास ते आवश्यकही असतेच.
सुभाष घई दिग्दर्शित ’हीरो’च्या प्रेस शोला जॅकी श्रॉफ आम्हा समिक्षकांसोबतच बसला, पण पिक्चर सुरु असतानाच मधूनच येणारी कॉमेन्टस वा मस्त फिरकी त्याला अपेक्षित नसावी असे मध्यंतरातील त्याच्या एक्स्प्रेशनवरून मला तरी वाटले.
’सच्चे का बोलबाला ’चा प्रेस शो संपल्यावर पाहिले तर चक्क देव आनंद आम्हा समिक्षकांना भेटायला आला होता, पण पिक्चर खास नव्हता हे या ’देवा’ला कसे सांगणार? तो मात्र आमचे चेहरे वाचण्यात एक्स्पर्ट. ही त्याची नेहमीची सवय. ’देस परदेस’नंतर त्याच्या दिग्दर्शनातील चित्रपटावर समिक्षा ती काय करणार असाच प्रश्न होता.
असे हे मिनी थिएटर काही चांगल्या आठवणी देत असतानाच नव्वदच्या दशकात बंद पडले. असे मिनी थिएटर याच इमारतीत होते हे आज सांगूनही कोणालाच खरे वाटणार नाही.
एक्सलसियरचे मेन थिएटर आजही थाटात सुरू आहे. 2016 साली सुभाष घई यांच्या मुक्ता आर्टसच्या वतीने त्याचा कारभार सुरू आहे. अतिशय पॉलिश्ड आणि ऐटदार असे हे थिएटर आहे. येथे काही हिंदी चित्रपटांचे प्रीमियर रंगलेत. अब्बास मुस्तान दिग्दर्शित ’बाझीगर’चा येथील प्रीमियर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण. सुभाष घईची त्यास विशेष उपस्थिती होती. सुभाष घईच्या आगमनाने शिल्पा शेट्टी फार सुखावल्याचे एका फोटोत दिसते. तीचही बरोबरच आहे, तिचा हा पहिलाच चित्रपट. माझी आणखी एक विशेष आठवण 1994 साली मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमा विभागाचे सगळेच खेळ येथे आयोजित करण्यात आले असता डॉ. जब्बार पटेल दिग्दर्शित मुक्ता या चित्रपटाने त्याचे उद्घाटन झाले असता थिएटरबाहेरच सोनाली कुलकर्णीच्या पहिल्या भेटीचा सुखद योग आला. तिचा हा पहिलाच मराठी चित्रपट आणि तिच्या गुणवत्तेने ती खूपच मोठी झेप घेईल हे अधोरेखित केले.
मुंबईतील जुन्या काळातील सिंगल स्क्रीन थिएटर्सपैकी हे एक छान मेन्टेन केलेले, देखणी अशी अंतर्गत रचना असलेले, मस्त वातानुकूलित (आणि चवीचा समोसा मिळणारे… हेदेखील महत्त्वाचे हो) थिएटर म्हणून त्याची यशस्वी वाटचाल अनेक आठवणींसह सुरू आहे. सुभाष घई यांच्या मुक्ता आर्ट्सच्या वतीने मुंबईतील काही चित्रपटगृहांचे सध्या व्यवस्थापन पाहिले जाते, त्यात हे एक आहे. आजही दिमाखदार आणि आकर्षक असेच आहे. एखाद्या चित्रपटगृहाचा दीर्घकालीन प्रवास असा लक्षणीय असतो.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply