माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांची उपस्थिती
पनवेल (प्रतिनिधी)
इतिहास लिहिणे सोपे असते, पण इतिहास घडविण्याचे कर्मकठीण काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी केले आहे. इतक्या कमी वेळात संघर्षाला सामोरे जायचे होते. नोव्हेंबर 2019मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो विश्वासघात झाला तो कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांशीही झाला होता. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे प्रकरण दाबण्यासाठी काय काय केले गेले याचे पुस्तक लिहायचे झाले, तर मोठा ग्रंथ लिहायला लागेल, असे प्रतिपादन माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी रविवारी (दि.25) येथे केले.
कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीतर्फे कर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या ठेवीदारांच्या संघर्षाची माहिती देणार्या ‘कर्नाळा एक ढासळलेला बुरूज’ या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत पनवेल शहरातील गोखले हॉल येथे करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी त्यांनी कर्नाळा बँकेच्या ठेवीदारांवर झालेल्या अन्यायाला सर्वप्रथम वाचा फोडणारे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांचा राज्यातील आदर्श व कर्तृत्ववान आमदार म्हणून उल्लेख केला.
या प्रकाशन समारंभास कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शहराध्यक्ष अनिल भगत, माजी महापौर कविता चौतमोल, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, विजय चिपळेकर, विकास घरत, मुकीत काझी, माजी पं.स.सदस्य भूपेंद्र पाटील, महिला मोर्चा पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, प्रल्हाद केणी, उद्योजक के. ए. म्हात्रे, के. सी. पाटील गुरुजी आदी उपस्थित होते.
कर्नाळा बँक घोटाळ्याच्या अन्यायाला वाचा फोडणारा घटनाक्रम उलगडताना माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सांगितले की, 31 ऑगस्ट 2019 रोजी रात्री 12 वाजून 5 वाजता वर्षा निवासस्थानावरून तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला फोन करून सांगितले की, कर्नाळा बँक घोटाळ्याविरोधात आवाज उठविणारे आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी माझ्याकडे आले आहेत. हे प्रकरण तुम्ही मार्गी लावा. त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. मी प्रयत्न करतो, अनेकांची कामे होत असतात, परंतु ठेवीदारांचे पैसे मिळाल्यानंतर वर्षभराने कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी समारंभ करतात आणि त्यात तुम्ही उपस्थित राहता यालाही दाद दिली पाहिजे.
कर्नाळा बँक घोटाळ्याचा तपास होऊ नये यासाठी अधिकार्यांवर दबाव, बदल्या आणि उलट घोटाळेबाज विवेक पाटील यांचे स्वागत, सत्कार झाले. काय बँकर आहे. ज्याला माहीत नाही त्याच्या नावाने दहा कोटींचे कर्ज काढतात आणि स्वतःच्या बिल्डिंग व्यवसायात टाकतात, पण आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी थांबले नाहीत. त्यांनी जिद्दीने संघर्ष, पाठपुरावा केला. त्यांना मानले पाहिजे. एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रात्री फोन करून सांगतात तुम्ही हे प्रकरण बाहेर काढा, सरकारकडून जे काही लागेल ते सहकार्य करू; तर दुसरे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भूमिका काहीही झाले तरी चालेल विवेक पाटीलला वाचवायचे अशी होती.
किरीट सोमय्या पुढे म्हणाले, या प्रकरणात अजून थोडे काम करायचे राहिले आहे. पुन्हा धक्का द्यायला लागेल. मध्यंतरी धर्मदाय आयुक्तांकडे गेलो होतो त्यांनी ज्या प्रॉपर्टी जप्त केल्या गेलेल्या आहेत त्याबाबत समजावून सांगण्यास सांगितले. सीआयडीलाही सांगू तपास बरोबर झाला पाहिजे. बंधू-भगिनींनो महाराष्ट्रात दुर्दैवाने सहकाराचा अर्थ स्वाहाकार झाला. याच पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी सहकार खात्याचे मंत्री बनविण्यात आले आहे. ते या क्षेत्राला न्याय देतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसर्यांदा पंतप्रधान बनणार असून भ्रष्टाचारमुक्त आर्थिक विकास होणार आहे आणि या विकासाचे फळ सर्वसामान्य जनतेला मिळेल.
कर्नाळा बँक घोटाळ्यात भरडलेले बहुतांश ठेवीदार हे विवेक पाटील यांच्याबरोबर ज्यांनी 25-30 वर्षे किंवा त्याहून अधिक काळ घालवला असेच आहेत. विवेक पाटलांनी आपल्या बहिणीच्या नावावरदेखील कर्ज उचलून पैसे खाल्ले. ज्यांनी आपल्या भगिनीला सोडले नाही त्यांच्याकडून चांगुलपणाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे, असे सांगून आमदार प्रशांत ठाकूर या वेळी म्हणाले की, दुर्दैव हेच आहे की एवढे सारे करूनही असा प्रचार केला त्यांनीच सर्वांचे पैसे परत केले, मात्र पैसे परत द्यायची वेळ का आली याचा विचार करण्याची उसंत त्यांच्याकडे नव्हती, पण मग पैसे खाल्ले कुणी? तुरूंगात ते एवढी वर्षे का आहेत याचे उत्तर कुणीतरी देण्याची गरज आहे. गोबेल्स निती वापरून राजकारण सुरू आहे, परंतु या प्रकरणाचा आम्ही पाठपुरावा करीत राहणार आहोत. या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह कर्नाळा बँक घोटाळा संघर्षात व ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकार्य करणार्या सर्वांचे आभार मानले.