रेवदंडा : प्रतिनिधी : कोर्लईनजीक पेट्रोल पंपासमोरील समुद्रलगतच्या खडकावर झोपलेल्या त्याच्या अंगाला पाणी लागले म्हणून त्याला जाग आली, तेंव्हा चारही बाजूने पाण्याने वेढल्याचे त्याच्या लक्षात आले. अपंग असल्याने त्याला फारशी हालचाल करता येत नव्हती, रात्रीचे जागरण, व जेवणही मिळाले नसल्याने शरिर अगदीच क्षीण झाले होते. मात्र पुढ्यात काळ येऊन ठेपल्याची जाणीव झाल्याने त्याने थोडीफार हालचाल करून बाजूच्या रस्त्याने जाणार्या युवकांचे लक्ष्य वेधून घेण्याचा प्रयत्न केला. त्या युवकांनी नजीकच्या चेकपोस्ट रील पोलिसांना याची माहिती दिली. ड्युटीवरील पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. चक्क पाण्यात जाऊन त्यांनी त्या अपंगाला बाहेर काढले. पोलिसांतील माणुसकीने त्या अंपगाला जीवनदान मिळाले होते.
अजिंक्य नाकटी हा पंचवीस वर्षीय अपंग युवक रेवदंडा येथे कामानिमित्त आला होता. तेथे उशीर झाल्याने मुरूडकडे जाणारी एसटी चुकली. त्यामुळे त्याला रेवदंडा एसटी स्टँडमध्ये रात्र काढावी लागली. सकाळी सात वाजता तो पायीच मुरूडकडे निघाला. वाटेत कोर्लई पेट्रोल पंपासमोरील समुद्र किनारी खडकावर झााडाच्या आडोशाला तो विश्रांतीसाठी बसला. तेथे डुलकी केव्हा लागली, हे त्याला समजेलच नाही. अकरा वाजता पाण्याने भिजत असल्याचे त्याच्या लक्षात आले. तो ज्या ठिकाणी झोपला होता, त्या खडकाच्या सभोवताली समुद्राच्या भरतीचे पाणी आले होते. त्याने हातवारे करुन समोरच्या रस्त्याने जाणार्या युवकांचे लक्ष वेधले. त्या युवकांनी नजीकच्या साळाव चेकपोस्टवरील पोलिसांंना कोणीतरी समुद्राच्या पाण्यात बुडत असल्याचे सांगितले. साळाव चेकपोस्टला डयुटीवर असलेले रेवदंडा पोलीस ठाण्याचे नाईक सुशांत भोईर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी थेट अजिंक्यकडे झेप घेतली आणि त्याला बाहेर काढले. श्री. भोईर यांनी अजिंक्यला चेकपोस्ट येथे आणले. त्याला पाणी दिले, त्यानंतर खायलाही दिले. त्यामुळे अजिंक्यच्या अंगात थोडी उभारी आली. अजिंक्य नाकटी या अंपग युवकांचा काळ आला होता, मात्र पोलीस नाईक सुशांत भोईर यांनी दाखविलेल्या तत्परतेने त्याला जीवनदान मिळाले. इतकेच नव्हे तर त्याला चेकपोस्ट येथे आणून खाऊ घातले, या घटनेने पोलिसांतसुध्दा माणुसकी असते हेच सिध्द केले.