तुमकूर ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून (दि. 2) दोन दिवसांच्या कर्नाटक दौर्यावर आहेत. सिद्धगंगा मठानंतर त्यांनी तुमकूरमध्ये एका जनसभेला संबोधित केले. त्यांनी विविध राज्यांतील शेतकर्यांना कृषी कर्मण अॅवॉर्ड दिले आहेत. आज आठ कोटी लोकांजवळ सन्मान निधी पोहचला आहे. नव्या वर्षात, नव्या दशकाच्या सुरुवातीलाच अन्नदात्या शेतकरी भावा-बहिणीचे दर्शन झाले हे माझे भाग्य आहे. 130 कोटी देशवासीयांच्या वतीने भारतातील प्रत्येक शेतकर्याला नववर्षाच्या शुभेच्छा देतो, असेही नरेंद्र मोदी म्हणाले. कृषी कर्मण अॅवॉर्डबरोबरच आज कर्नाटकाच्या धरतीवर आणखी एका इतिहासाची नोंद झाली आहे. या कार्यक्रमातच फक्त देशातील सहा कोटी शेतकरी कुटुंबीयांच्या खात्यात 12 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
देशात एक असा काळ होता ज्यावेळी गरिबांना एक रुपया पाठवल्यावर फक्त 15 पैसे पोहचत होते. इतर 85 पैसे मधलेच खात होते. आज जेवढे पैसे आपण पाठवत आहोत, ते पूर्णतः शेतकर्यांच्या खात्यात जात आहेत.
दशकांपासून धूळ खात पडलेल्या सिंचन योजना सुरू झाल्या असून, शेतीच्या विम्याशी निगडित नियमांतही बदल करण्यात आला आहे. सॉइल हेल्थ कार्ड असो किंवा युरियाचं नीम कोटिंग आम्ही शेतकर्यांना प्रथम प्राधान्य दिले आहे. या सभेत पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा तिसरा हप्ता (डिसेंबर 2019 ते मार्च 2020)चा शुभारंभ करण्यात आला. तसेच कर्नाटकला कृषी कर्मण पुरस्कारदेखील पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात आला. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार किसान सन्मान निधी योजनेचा तिसर्या हप्त्याचा लाभ देशातील सहा कोटी शेतकर्यांना मिळाला असून, एकूण 12 हजार कोटी रुपये शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.