Breaking News

खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील -मंत्री उदय सामंत

उरण ः प्रतिनिधी, बातमीदार, वार्ताहर

महाविकास आघाडीने केवळ टीकेसाठी टीका करू नये, विकासावर बोलावे. आम्हीच बनवलेल्या रस्त्यावरून येऊन आमच्यावरच टीका करू नका, असा टोला राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ’उबाठा’ प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला. मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे तीन लाखांहून अधिक मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
मावळ लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय, रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकार्‍यांचा मेळावा रविवारी (दि.7) उरणमधील जेएनपीटी मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मंत्री सामंत बोलत होते.
व्यासपीठावर माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, सरचिटणीस राजेंद्र पाटील, उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह, खालापूर तालुकाध्यक्ष प्रवीण मोरे, महिला मोर्चा तालुकाध्यक्ष राणी म्हात्रे, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील यांच्यासह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उरणमध्ये बोलताना महायुतीवर तोंडसुख घेतले होते. त्याला मंत्री उदय सामंत यांनी सडेतोड उत्तर दिले. चांगले झाले की फुकटचे श्रेय घ्यायची काही लोकांची प्रवृत्ती असते. निवडणुका आल्या की, त्यांना बाळासाहेब ठाकरे, दि.बा. पाटील यांची नावे आठवतात. निवडणुका गेल्या की त्यांचे फेसबुक लाईव्ह सुरू होते. केंद्र व राज्य सरकारने उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. केवळ भावनिक भाषणे देण्याऐवजी विरोधकांनी विकासावर बोलावे. उत्तम दर्जाचे रस्ते केल्यामुळे आता 55 मिनिटांत उरणला येता येते. त्याच रस्त्यावरून यायचे आणि आमच्यावरच टीका करायची हे चालणार नाही. टीका करायचीच असेल, तर तुम्ही बनवलेल्या रस्त्याने या. नाहीतर पाण्यातून पोहत या, अशी खरमरीत टीका सामंत यांनी केली.
नवी मुंबई-पनवेल येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देण्याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने घेतला व केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. आता त्यावर केंद्र शासनाकडून कार्यवाही सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना राजीनामा देण्याच्या दिवशी दि.बा. पाटील यांचे विमानतळाला देण्याची आठवण झाली होती, यातच सर्वकाही आले, असे सामंत म्हणाले.
खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्र शासनाच्या माध्यमातून उरण विधानसभा मतदारसंघात झालेल्या कामांची माहिती दिली. आठ पदरी रस्ता, पनवेल-उरण रेल्वे, देशातील सर्वांत मोठे विमानतळ, प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी केलेले प्रयत्न, आदिवासी पाड्यांपर्यंत वीजपुरवठा, अटल सागरी सेतू, मच्छीमारांच्या प्रश्नांचा पाठपुरावा, दत्तक ग्राम म्हणून उरणमधील बांधपाडा खोपटे गावाचा विकास केल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. केलेली विकासकामे व मतदारसंघातील जनसंपर्क या जोरावर आपण विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महायुती म्हणून आपण गेली दहा वर्षे एकत्र काम करीत आहोत. त्यामुळे महायुती एकजीव झाली आहे. नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी मावळ मतदारसंघातील घराघरापर्यंत धनुष्यबाण चिन्ह पोहचवा. प्रत्येक बूथवर किमान 51% ज्यादा मते मिळावित यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. उरण, पनवेल दोन्ही विधानसभा मतदारसंघांत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लावली आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तिसर्‍यांदाही विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
खासदार श्रीरंग बारणे हे जनतेची नस ओळखून काम करणारे खासदार आहेत. असा खासदार मिळणे हे आपले सुदैव आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी काढले. ते पुढे म्हणाले की, विकासकामांच्या जोरावर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांचा विजय आम्ही निश्चितच करणार यात तीळमात्र शंका नाही. उरणच्या माजी आमदारांनी जनतेची कामे करणार्‍यांवर टीका करू नये. मतदारसंघातील न होणारी कामे आम्ही पाठपुरावा करून मार्गी लावत आहोत. त्यामुळे मते मागण्याचा अधिकार आणि हक्क आम्हाला आहे. उरण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मत विकासालाच मिळेल याची काळजी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी.
केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील महायुती सरकारने अनेक गेम चेंजर प्रकल्प उरण तालुक्याला दिले असून त्यामुळे तालुक्याचा पूर्ण कायापालट झाला आहे याकडे आमदार महेश बालदी यांनी लक्ष वेधले. उद्धव ठाकरे यांनी उरणमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार जाहीर केला. त्या वेळी त्यांनी 23 मिनिटांचे भाषण केले, मात्र त्यापैकी तीन मिनिटेदेखील ते उरणविषयी बोलले नाहीत. मुख्यमंत्री असताना त्यांनी उरणसाठी काय केले, असा थेट सवाल आमदार बालदी यांनी केला. भावनिक भाषणांना मतदार भुलणार नाहीत, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व.दि.बा. पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती शासनाने एकमताने घेतला व केंद्र शासनाकडे पाठवला ही वस्तुस्थिती आहे. तरीदेखील काही मंडळी विनाकारण खोटी माहिती पसरवून संभ्रम निर्माण करीत आहेत, असा आरोप ‘दिबां’चे पुत्र अतुल पाटील यांनी या वेळी केला. दि. बा. पाटील यांना मानणार्‍या प्रत्येकाचे मत खासदार बारणे यांनाच मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड म्हणाले की, नरेंद्र मोदी हे संविधानाला मानणारे पंतप्रधान आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगभरातील स्मारकांसाठी केंद्र व महायुती शासनाने मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे. डॉ. आंबेडकर यांचा एवढा सन्मान यापूर्वी कधी झाला नव्हता. देशाला मागासवर्गीय व आदिवासी राष्ट्रपती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही पंतप्रधान मोदींनीच घेतला. त्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार आरपीआयची सर्व मते महायुतीलाच मिळतील.
महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच मिळणार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी अनेक योजना राबविल्यामुळे समस्त नारीशक्ती महायुतीच्या मागे उभे राहील, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे यांनी म्हटले.
मेळाव्याचे सूत्रसंचालन नितेश पंडित यांनी केले, उपस्थितांचे आभार संतोष भोईर यांनी आभार मानले.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply