ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांचे आणि अजितदादा पवार यांचे राजकीयदृष्ट्या कधीही फारसे पटले नाही हे एकंदरीत दिसते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी विशेष जवळीक असणार्या संजय राऊत यांनी अजितदादांबद्दल मात्र उलटसुलट विधाने करणे सोडलेले नाही. त्याचा स्फोट मंगळवारी अजितदादा पवार यांच्या एका पत्रकार परिषदेत झाला. तुम्ही तुमच्या पक्षाचे प्रवक्तेपद सांभाळा, आमची वकिली करण्याचे काही कारण नाही अशा शब्दांत त्यांनी संजय राऊत यांना सुनावले. ‘… वसंतकाले संप्राप्ते काक काक: पिक पिक:’ हे संस्कृत सुभाषित वापरून ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोरील आपला युक्तिवाद संपवला होता. वसंत ऋतु आला की कावळा कोण आणि कोकीळ कोण हे कळून येते, अशा अर्थाचे हे सुभाषित आहे. घटनापीठाचा निकाल कुठल्याही क्षणी लागू शकतो ही परिस्थिती ध्यानात आल्याने महाराष्ट्रातील राजकारणात अनेक कावळ्यांची कावकाव सध्या सुरू आहे. घटनापीठाचा निकाल शिंदे गटाच्या विरोधात गेल्यास विद्यमान सरकार पडेल आणि भाजपसोबत साथसंगत करून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार हे राज्याच्या कारभाराचा डोलारा सांभाळतील या एका तकलादू अंदाजावर सध्या महाराष्ट्राचे राजकारण पेटले आहे. वास्तविक या प्रकारच्या वावड्यांना काहीही अर्थ नाही अशा शब्दांत खुद्द अजितदादा पवार यांनी पत्रकारांना फटकारल्यानंतरही ही चर्चा थांबलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस लवकरच फुटणार असून या फुटीमागे अजितदादा पवार यांचे राजकारण आहे अशा प्रकारच्या अफवा मुद्दाम कुणीतरी हवेत सोडून दिल्या आहेत हे उघड आहे. त्यांना उत्तरे देता देता खुद्द अजितदादा पवार यांची पुरती दमछाक झाली हेही खरेच आहे. जीवात जीव असेपर्यंत मी पक्षाचेच काम करत राहणार असा स्पष्ट निर्वाळा देऊन अजितदादांनी या वादळाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता, तो फारसा यशस्वी झाला असे मात्र म्हणता येणार नाही. तथापि या सगळ्याला कारणीभूत त्यांच्याच महाविकास आघाडीतील काही तोंडाळ नेते आहेत हे त्यांनी विसरू नये. अजितदादा पवार हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नेते आहेत. किंबहुना, त्यांना वगळून महाराष्ट्राचे राजकारण पुढे नेता येणार नाही. स्पष्टवक्तेपणा आणि निर्णयक्षमतेसाठी ते प्रसिद्ध आहेत. केवळ विरोधासाठी विरोध करण्याचे राजकारण त्यांनी कधीही केले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि ईव्हीएमबद्दलची त्यांची अनुकूल मते यामुळे त्यांच्याच पक्षातील काही नेते तोंडघशी पडलेत. राष्ट्रवादी काँग्रेसची वकिली करू पाहणारे काही विश्वप्रवक्ते विनाकारण अजितदादा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे ठपका ठेवण्याचा उद्योग करत होते. त्यांनाही अजितदादांनी चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. गेली अडीच-तीन वर्षे अजितदादांच्या प्रतिमेला तडे जातील अशा प्रकारची वक्तव्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच वेळोवेळी केली. एकीकडे एकजुटीची वज्रमूठ दाखवत महाराष्ट्रभर सभा घेत हिंडायचे आणि दुसरीकडे एकमेकांचीच उणीदुणी काढायची असा प्रकार महाविकास आघाडीत सध्या सुरू आहे. सत्तेसाठी एकत्र आलेल्या या तिन्ही पक्षांना विरोधात असताना एकजूट दाखवणे कठीण जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ऑपरेशन लोटस सुरू असल्याची हवा निर्माण केली जात आहे. परंतु महाविकास आघाडीची तथाकथित एकजूट फोडण्यासाठी कुठल्याही ऑपरेशनची गरज नाही यातच सारे काही आले.
Check Also
तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड
पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …