नवी मुंबई : प्रतिनिधी
कोरोनाचा भयंकर कहर पाहता तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता नवी मुंबई क्षेत्रात शासकीय मेडिकल पदवी कॉलेज व भव्य हॉस्पिटल उभारण्याची मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास विभाग व सिडको यांना प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांचे नवी मुंबईकरांतर्फे आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आभार मानले. त्याच पार्श्वभूमीवर आमदार मंदा म्हात्रे यांनी सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांची शुक्रवारी (दि. 14) भेट घेतली. सिडको प्रशासनाने खाजगी शिक्षण संस्थांना अनेक भूखंड वितरित केले आहेत. शासकीय मेडिकल कॉलेज उभारण्याकरिताही सिडकोने 10 एकर जागेचा शोध सुरू केला असून लवकरच नवी मुंबईमध्ये शासकीय मेडिकल पदवी कॉलेज व भव्य कोविड हॉस्पिटल उभारण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे. बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सिडको महामंडळाकडे बेलापूर विधानसभा क्षेत्रात अनेक भूखंड विनावापर पडून आहेत. त्यामुळे सदर भूखंडांवर अतिक्रमण होण्याची शक्यता असल्याने त्यापैकी एखादा मोठा भूखंड कोविड हॉस्पिटल तसेच शासकीय मेडिकल पदवी कॉलेजकरिता आरक्षित करण्यास काहीही हरकत नाही. कोरोनासारख्या महाभयंकर रोगावर नियंत्रण मिळविण्याकरिता नियोजन करणे गरजेचे आहे. यामुळे नवी मुंबईतील कोरोना रुग्णांना योग्य उपचार मिळतील व कोणीही उपचारविना वंचित राहणार नाही, तसेच कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येलाही आळा बसेल व उपचाराचा खर्चही कमी होईल. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा लाभ होणार आहे. नवी मुंबई क्षेत्रात एकही शासकीय मेडिकल पदवी कॉलेज नसल्याने स्थानिक विद्यार्थ्यांना खाजगी कॉलेज किंवा नवी मुंबई बाहेरील कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षणाकरिता जावे लागत आहे. तसेच पात्रता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय शिक्षणापासून वंचित असणार्या विद्यार्थ्यांनाही उच्च वैद्यकीय शिक्षण मिळावे, याकरिता नवी मुंबईत मेडिकल कॉलेज उभारण्याची आवश्यकता आहे. नवी मुंबई महापालिका व सिडको यांच्या माध्यमातून कोविड सेंटर उपलब्ध करण्यात आलेले आहेत, परंतु तेही अपुरे पडत आहेत. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नवी मुंबईमध्ये सुमारे 10 एकर जागेत शासकीय मेडिकल पदवी कॉलेज तसेच भव्य, सुसज्ज व सर्व सुविधांयुक्त असे कोविड हॉस्पिटल उभारण्याची मागणी होती, असे आमदार म्हात्रे यांनी सांगितले.