पनवेल : रामप्रहर वृत्त
देशात कुणाचीही सत्ता असू द्या, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कधीही बदलणार नाही, त्यामुळे विरोधकांनी स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी संविधानाबाबत अपप्रचार करू नये, असा सूचना वजा इशारा महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी खांदा कॉलनी येथे झालेल्या बैठकीत दिला. कामगार व रिक्षा चालकांची बैठक झाली. त्यावेळी आपले विचार मांडताना ते बोलत होते.
या बैठकीला भाजपचे मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर कविता चौतमोल, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस शिवदास कांबळे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, शहर अध्यक्ष अनिल भगत, शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रथमेश सोमण, तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, माजी नगरसेवक एकनाथ गायकवाड, ओबीसी सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, महिला मोर्चाच्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, शिवाजी थोरवे, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, पांडुरंग पाटील, विनायक मुंबईकर, भीमराव पोवार, मोतीलाल कोळी यांच्यासह कामगार व रिक्षाचालक मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार श्रीरंग बारणे यांनी पुढे म्हटले की, अबकी बार चारसौ पारची घोषणा केल्यानंतर विरोधकांची हवा गुल झाली आणि त्यांना भीतीही वाटली आहे, त्यामुळे लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झाल्यापासून विरोधकांनी संविधानाचे राजकरण करायला घेतले आहे. संविधान बदलण्याचा कोणताही प्रयत्न नसताना राहुल गांधी आणि इतर विरोधकांनी प्रचाराचा रचलेला षडयंत्र जनताच हाणून पाडत आहे, असेही बारणे यांनी नमूद केले. डॉ. बाबासाहेबांचे लंडन मधील घर खरेदी करून त्या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक करण्यात आले हे काम तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तर मुंबईतील इंदू मिल मधील स्मारकाचे काम उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ठप्प केले. ते काम प्रगती पथावर नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार आग्रही आहे, असे सांगतानाच विरोधकांना बाबासाहेब समजलेत नाहीत, अशा शब्दात विरोधकांच्या प्रचाराची हवा घालवली. देशातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांना सन्मान देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे, असे सांगून उद्धव ठाकरेंचे सरकार असताना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना किंमत नव्हती असेही आप्पा बारणे यांनी नमूद केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, ही निवडणूक देशाच्या भवितव्यासाठी महत्वपूर्ण आहे. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशवासियांना दिला आहे. सबका साथ सबका विश्वास या उद्देशाने प्रेरीत होऊन काम केले जात आहे. मोदीजींच्या कामाने देशात तर आहेच, पण संपूर्ण जगात प्रभाव आहे. मोदीजी चहा विकायचे हे अभिमानाने सांगतात त्याचप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण रिक्षाचालक होतो हे अभिमानाने सांगतात, त्यामुळे त्यांना तुमच्या प्रश्नांची जाण आहे, असे सांगतानाच तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यावर श्रीरंग आप्पा बारणे खासदारकीच्या विजयाची हॅट्रिक करणार आहेत.
कामगार म्हणून काम करताना प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची आवश्यकता असते. संघटनेचे प्रश्न आपले आहेत असे मानून ते सोडविण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी करत असतात. आमदार प्रशांत ठाकूर यांची हॅट्रिक झाली आता आप्पा बारणे हॅट्रिक करणार आहेत.
-जितेंद्र घरत, अध्यक्ष, जय भारतीय जनरल कामगार संघटना
रिक्षाचालक मालकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून न्याय मिळवून देण्याचे काम आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. त्यामुळे त्यांच्या पाठीशी संघटना ठाम आहे आणि त्या अनुषंगाने खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांना मताधिक्य देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
-रवी नाईक, अध्यक्ष,वंदे मातरम जनरल कामगार संघटना