दुबई ः वृत्तसंस्था
अडखळत सुरुवात करणार्या ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये अखेर स्वतःला सिद्ध केले. ऑस्ट्रेलिया दौर्यापाठोपाठ त्याने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत अविश्वसनीय कामगिरी करून जगाला स्वतःची दखल घेण्यास भाग पाडले. त्यातच आयसीसीने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत ऋषभने थेट सात स्थानांची झेप घेत थेट रोहित शर्मासोबत बरोबरी केली. भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ आता 747 गुणांसह आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सातव्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्मा आणि न्यूझीलंडचा हेन्री निकोल्स हेही संयुक्तपणे सातव्या क्रमांकावर आहेत. आतापर्यंत भारताच्या एकाही यष्टिरक्षक फलंदाजाला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप टेनमध्ये प्रवेश करता आलेला नाही. पंतने ते करून दाखवले.
अष्टपैलू अश्विनचीही आगेकूच
आर अश्विन यानेही ऑस्ट्रेलिया व इंग्लंड यांच्याविरुद्धच्या कसोटी मालिकेत अष्टपैलू कामगिरी केली. त्यामुळेच त्यानेही गोलंदाजांच्या क्रमवारीत थेट दुसरे स्थान पटकावले. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत शतकी खेळीसह त्याने एकूण 32 विकेट्स घेतल्या. याच मालिकेतून पदार्पण करणार्या अक्षर पटेलने 27 विकेट्स घेत इतिहास रचला. त्याने आठ स्थानांच्या सुधारणेसह 30वा क्रमांक प्राप्त केला आहे.