Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस समाजाचा वाढदिवस -पद्मश्री मधु मंगेश कर्णिक

केशवसुत स्मारकाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 10 लाखांची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे राजकारणापेक्षा समाज आणि जनतेसाठी केलेले सामाजिक कार्य मोठे आहे. समाजाचे ऋण, सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या कार्यामुळे त्यांच्या वाढदिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांचा वाढदिवस हा समाजाचा वाढदिवस आहे, असे गौरवोद्गार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी पनवेल येथे काढले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने एक कृतार्थ संध्याकाळ या साहित्यिक कार्यक्रमांतर्गत कविसंमेलन, सन्मान पुरस्कार व सत्कार सोहळ्यात पद्मश्री कर्णिक बोलत होते.
पनवेलच्या विरूपाक्ष मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास लोकनेते रामशेठ ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुप्रसिद्ध कवी-साहित्यिक अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व कामगार नेते महेंद्र घरत, कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्कप्रमुख प्रा.एल.बी. पाटील, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, सचिव डॉ. एस.टी गडदे, भाजपचे उत्तर रायगड अध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगराध्यक्ष सईद मुल्ला, चारुशीला घरत, कोमसाप मुरूड शाखेचे अध्यक्ष संजय गुंजाळ, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.के. पाटील, अर्थतज्ज्ञ जे.डी.तांडेल, खारघरच्या रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्य राज अलोनी, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी आदी उपस्थित होते.
पद्मश्री मधु मंगेश कर्णिक पुढे बोलताना म्हणाले, साहित्याला संस्कार आहेत. आजच्या समारंभाला सरस्वती, साहित्याचा स्पर्श आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखे काम लोकनेते रामशेठ ठाकूर या भागात करीत आहेत. महाराष्ट्रात कुठेही साहित्यिकांची स्मारके नाहीत. मालगुंड येथे केशवसुतांचा जन्म झाला. आमचं भाग्य आहे की, रत्नागिरीच्या मालगुंड येथे आधुनिक ज्ञानेश्वर अर्थातच केशवसुत यांचं स्मारक आम्ही उभं करू शकलो. जिथे-जिथे मराठी भाषा बोलली जाते, मराठी लेखन केले जाते तिथे केशवसुतांचे साहित्य वाचलं जातं.
राजकारण एक माध्यम आहे, त्यात विधायक-रचनात्मक पद्धतीने लोकनेते रामशेठ ठाकूर काम करीत आहेत. पनवेल हे कोकणचे नाक आहे, कोकणची श्रीमंती आहे. या जिल्ह्यात मोठी गुंतवणूक होत आहे. अशा जिल्ह्याचे रामशेठ ठाकूर कर्तबगार नेतृत्व असल्याचे पद्मश्री कर्णिक यांनी सांगितले.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले, ज्येष्ठ साहित्यिकांमध्ये माझा वाढदिवस साजरा होत आहे याचे मला खूप समाधान वाटत आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात अनेक लहान मोठे कार्यक्रम झाले. दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्यानंतर कार्यक्रम झाले, परंतु त्या कार्यक्रमातून जो आनंद मला मिळाला नाही तो आजच्या कार्यक्रमातून मिळाला.
रत्नागिरीच्या मालगुंड येथे केशवसुतांचे जन्मगावी स्मारक आहे, त्या स्मारकाला 10 लाख रुपयांची मदत लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कार्यक्रमात जाहीर केली. त्याचप्रमाणे पद्मश्री मधु मंगेश कर्णिक आणि सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी सांगितल्याप्रमाणे कोकण आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पनवेलमध्ये भरवण्यासाठी संमती दिली.
ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे म्हणाले, राजकारणात राहून राजकारणात नसलेला आणि समाजकारणात खंबीरपणे उभा असलेला नेता म्हणजे रामशेठ ठाकूर. मुख्यमंत्री असताना विलासराव देशमुख म्हणायचे,
प्रत्येक जिल्ह्यात रामशेठ ठाकूर यांच्यासारखे एक नेतृत्व असायला पाहिजे. पालघरच्या आदिवासी भागातील मोखाडा येथे रामशेठ ठाकूर यांनी महाविद्यालय उभं केलं ते त्यांच्या आयुष्यातील सर्वोच्च बिंदू आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांचा झालेला सत्कार हा त्यांचा नसून उद्याच्या पिढीला रामशेठ ठाकूर यांचे कार्य कळावे म्हणून झालेला हा सत्कार समारंभ आहे.
रामशेठ ठाकूर यांच्याकडे पाहिल्यानंतर देता-देता इतके द्यावे, देणार्‍यांनी रामशेठ व्हावे अशी भावना येत असल्याचेही त्यांनी सांगितले.
सुप्रसिद्ध कवी अशोक नायगावकर यांनी, महाराष्ट्रातील दानशूर व्यक्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे विविध क्षेत्रात अफाट काम आहे.त्यांच्या बाजूला व्यासपीठावर बसण्याचा योग आला हे माझे भाग्य आहे, असे सांगून
त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित देखण्या साहित्यिक कार्यक्रमाचे कौतुक केले. नायगावकर यांनी आई वरती माय कविता सादर केली तसेच आपल्या भाषणातील काव्यातून सभागृहाला पोट धरून हसायला लावले.
सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या परिचयातील माजी खासदार हा शब्द मला खटकतो. अखंड खासदार रहावे असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे.
ते आपल्या गावाहून प्रतिभा घेऊन आले, मी त्यांना शिक्षकाच्या भूमिकेतून पाहतो, असे सांगून आजच्या सुंदर साहित्यिक सोहळ्याचे कौतुक करीत आपल्या कविता सादर केल्या.
या वेळी कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेच्या वतीने पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात आला. यानंतर झालेल्या सन्मान पुरस्कारात
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानात मुंबई विभागात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल, रायगड जिल्हा परिषदेने उत्कृष्ट शाळा म्हणून गौरवलेली पनवेल तालुक्यातील जिल्हा परिषदेची वारदोली शाळा, गरीब गरजूंच्या शिक्षणासाठी कार्यरत असणारे खारघर येथील प्रा.डॉ.गोरोबा डोंगरगावकर तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पनवेल, नवीन पनवेल, उरण, कर्जत शाखांमधील ज्येष्ठ साहित्यिक ए.के. शेख, अ‍ॅड.प्रा. चंद्रकांत मढवी, अ‍ॅड. गोपाळ शेळके, किशोर डी. पाटील यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्तिकात नवीन पनवेल शाखेच्या वर्षभरातील कार्यक्रम, उपक्रमांचा आढावा घेतला. सूत्रसंचालन रंजना केणी आणि दर्शना माळी यांनी केले, तर प्रार्थना मनस्वी माळी हिने गायली. या वेळी आलेल्या कवी, लेखक, साहित्यिक त्याचप्रमाणे शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, क्षेत्रातील मान्यवरांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply