Breaking News

आमची बाजू सत्याची; सरकाकडे अपील करणार; डॉ. अविनाश गाताडे व संतोष माळी यांची माहिती

पनवेल : रामप्रहर वृत्त

सावळे ग्रामपंचायतीत जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र संदीप भोईर यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागल्याने त्यांनी या रागातून व राजकीय आकसापोटी तक्रार दाखल केली. त्यावरून कोकण आयुक्तांनी सहा वर्षे निलंबनाची कारवाई आदेश काढले असले तरी आमची बाजू सत्याची आहे. त्यामुळे या संदर्भात राज्य सरकाकडे अपील करणार आहोत, असे सावळे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अविनाश गाताडे, संतोष माळी यांनी स्पष्ट केले आहे. अविनाश गाताडे व संतोष माळी यांनी या संदर्भात म्हटले आहे की, मी सरपंच व सदस्य असताना ग्रामपंचायतीमार्फत कोणतेही काम मासिक सभेत ठराव न घेता केलेले नाही. तक्रादाराने नमूद केलेली पाईपलाईन प्रभाग क्रमांक 2 मधील तीन कुटुंबांसाठी नसून ती आठ कुटुंबांसाठी आहे आणि या पाईपलाईनसाठी फक्त एका पाईपची आवश्यकता होती. त्यामुळे हा पाईप संबंधित लोकांनी स्वखर्चातून विकत आणून बसविला आहे. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या साहित्याची नोंद ग्रामसेवक यांनी करणे क्रमप्राप्त असते, पण हा पाईप लोकवर्गणीतून घेतला असल्याने कदाचित ग्रामसेवकांनी साठा रजिस्टरमध्ये नोंद केली नसावी. त्याचबरोबर तक्रारदाराने नमूद केलेले कृष्णा भोजने, रामदास क्षीरसागर, चंद्रमणी तांबे या ग्रामस्थांनी बांधलेली घरे गुरचरण जागेत नसून एचओसीएल कंपनीच्या सर्वे क्रमांक 160मध्ये आहेत. या घरांची कामे ही आम्ही ग्रामपंचायत सदस्य या पदावर निवडून येण्याच्या आधी झालेली आहेत व या सर्वे क्रमांकामध्ये यापूर्वी जवळपास 25 घरे बांधलेली आहेत. या अतिक्रमणाबाबत जागा मालक म्हणजेच एचओसीएल कंपनीने अतिक्रमण हटविण्यासाठी ग्रामपंचायतीसोबत कार्यवाही करणे आवश्यक होते, परंतु 1990पासून आजपर्यंत अशी कार्यवाही झालेली दिसून येत नाही तसेच आम्ही ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत या ग्रामस्थांना महाराष्ट्र शासनाच्या शासन निर्णयानुसार कर आकारणीसाठी एचओसीएल कंपनीच्या जागी अतिक्रमित घरपट्टी दिलेली आहे. कारभारात कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केले नसतानाही व निर्दोष कारभार असतानादेखील संदीप भोईर यांनी खोडसाळ वृत्तीने राजकीय आकसापोटी तक्रार दाखल केली आणि त्याला राजकीय स्वरूप दिले. गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला सारून एकत्रितपणे काम करणे गरजेचे असते, मात्र उपसरपंचपदाच्या विश्वास ठरावात पराभूत झाल्याने संदीप भोईर यांना तो पराभव जिव्हारी लागला आणि या रागातून त्यांनी तक्रार दाखल केली, असेही अविनाश गाताडे व संतोष माळी यांनी अधोरेखित केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply