मोहोपाडा : प्रतिनिधी
गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी ‘लालपरी’ पुन्हा एकदा सुरू झाल्याने सर्वसामान्यांना सुखद दिलासा मिळाला आहे.
एस टी कर्मचार्यांच्या आंदोलनाबाबत उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर परतणार्या एसटी कर्मचार्यांची संख्या वाढू लागली आहे. यातील बहुतेक कर्मचारी रुजू झाले आहेत. लालपरीतून खूप दिवसांनी प्रवास करायला मिळणार हा क्षणच वेगळा असल्याचे काही प्रवाशांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात आज कित्येक महिन्यांनी लालपरीचे आगमन झाले आहे. अनेक महिला कर्मचारी पुन्हा ड्युटीवर जॉईन होताना भावनिक होत असल्याचे दिसून येत आहे. सोशल मीडियावर देखील या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. या मुळे का होईना एस टी हा विषय सर्वसामान्यांच्या अतिशय जवळचा आणि जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून एसटीचे चाक आगारातच रुतले होते. मात्र आज एसटीने पुन्हा एकदा धाव घेतली असल्याचे पाहायला मिळत आहे. ग्रामीण भागात एसटी आगारातील 99% कामगार कामावर रुजू झाले असून, लालपरिंच्या चाकांनी पुन्हा वेग धरला आहे.
दरम्यान, आता लांब पल्ल्यांच्या गाड्या देखील पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या आहेत. एसटी कर्मचार्यांचा संप सुरू झाल्यापासून खासगी वाहतूक करणारे चालक अव्वाच्या सव्वा पैसे घेत होते. त्यांच्या या मनमानीमुळे सर्वसामान्य माणसाला खूप त्रास सहन करावा लागत होता. या मुळे ही बससेवा पूर्ववत झाल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांच्या चेहर्यावर समाधान दिसून येत आहे.