Breaking News

मोदी पर्व पुन्हा सुरू

सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या राजबिंड्या राजपुत्रापेक्षा तळागाळातून परिस्थितीशी झगडत ध्येयनिष्ठेने प्रेरित होऊन स्वत:च्या कर्तबगारीच्या जोरावर देशातील सर्वोच्च सत्तास्थानी विराजमान झालेले मोदी लोकांना अधिक जवळचे, विश्वासपात्र व विसंबून राहण्याजोगे वाटतात. याखेरीज आणखी एका घटकामुळे लोकांना मोदी हाच उत्तम पर्याय आहे असे ठामपणाने वाटते. ती म्हणजे, राजकीय अस्थिरतेची भीती.

कोटी कोटी मतदारांनी माझ्यासारख्या फकिराची झोळी भरली, अशा हृदयाला हात घालणार्‍या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या भरघोस मतदानाचे वर्णन केले. खरोखरच मोदींनी केलेले हे वर्णन अत्यंत समर्पक असेच आहे. फकिराच्या झोळीत दान टाकताना देणार्‍याच्या मनात नि:स्सिम श्रद्धाच असते. अशी श्रद्धा की, आपण याला मूठभर दिले तर याच्या आशीर्वादाने परमेश्वर आपले घर भरून टाकेल. अशाच काहिशा श्रद्धेने, आंतरिक विश्वासातून तमाम भारतीयांनी मोदींच्या नावावर भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले आहे. मोदींकडे पाहात मत देणार्‍या या सर्वसामान्य भारतीयाच्या मते निव्वळ मोदीच देशाच्या सीमा सुरक्षित ठेवू शकतात, देशाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा जबाबदारीने हाकून देशाला प्रगतीपथावर नेऊ शकतात, आंतरराष्ट्रीय नेत्यांच्या मांदियाळीत दिमाखदारपणाने आणि तरीही मित्रत्वाने वावरू शकतात आणि स्वगृहीही तेच देशाची पारंपरिक सांस्कृतिक अस्मिता जपू शकतात. इतके प्रचंड मोठे बहुमत मोदींनी कमावले कारण हरतर्‍हेच्या भारतीय माणसाला मोदींमध्येच उद्याची आशा दिसते आहे. यात परंपरेने संघपरिवारासोबत असलेले मतदार जसे आहेत, तसेच भ्रष्टाचारी, निष्क्रिय राजवटीला कंटाळून ही व्यवस्था बदललीच पाहिजे या निर्धाराने भाजपकडे वळलेलेही आहेत. पाच वर्षांत जर काही काम उणे राहिलेच असेल तर मोदींना आणखी संधी दिलीच पाहिजे असे या वर्गाला मनोमन वाटते. याखेरीज ज्यांना अन्य पर्यायी नेत्यांमध्ये काहीच राम वाटत नाही असेही लोक मोदींमध्येच आधार शोधतात. नेमके हेच विरोधकांच्या आणि राजकीय पंडितांच्या ध्यानात आले नाही. त्यामुळेच विरोधकांचा मोदींना लक्ष्य करणारा विखारी प्रचार त्यांच्यावरच उलटला. विशिष्ट प्रांता-प्रदेशापुरती मर्यादित असलेली तुटपुंजी लोकप्रियता घेऊन अवघ्या देशाचे पंतप्रधानपद भूषवण्याचे स्वप्न पाहणारे नेते मोदींच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वासमोर आणखीनच खुजे भासतात. अशा नेत्यांची कशीबशी एकत्र उभी राहिलेली आघाडी ही दोलायमान, बुडती नौका असल्याचे भारतातल्या सामान्यातल्या सामान्य माणसालाही कळते. कथित विचारधारांचे प्रतिनिधित्व करणारी ही नेतेमंडळी 21व्या शतकातल्या तरुण मतदारांच्या तर अजिबातच पसंतीस उतरू शकत नाहीत. नव्हे, तरुण मतदारांशी या नेत्यांचा काही संवादच होऊ शकत नाही. या तरुण मतदारांना स्वत:साठी जे हवे आहे, देशासाठी जे हवे आहे, ते देण्याची सुतराम शक्यता या नेत्यांच्या ठायी दिसत नाही. याउलट मोदीच्या कार्यक्षमतेबद्दल, निर्णायक कार्यशैलीबद्दल आणि त्यांच्या प्रखर आत्मविश्वासाबद्दल तमाम भारतीयांना आकर्षण वाटते. आपल्या भाषणात गुरूवारी मोदींनी देशाचे वर्णन ‘नवा भारत’ असे केले. या नव्या भारताने मोठ्या विश्वासाने आपली जोखीम-जबाबदारी मोदींच्या समर्थ हातांच्या सुपूर्द केली आहे.

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply