Breaking News

प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा अध्यादेश काही दिवसांत काढणार -मुख्यमंत्री

नवी मुंबई ः बातमीदार
सिडको प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्याच्या अध्यादेशावर माझी सही झाली असून काही दिवसांत अध्यादेश जारी होईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि. 22) केली. ते ऐरोली येथे साकारण्यात येत असलेल्या कोळी भवनाच्या भूमिपूजन समारंभात बोलत होते.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील भाजपचे गटनेते आमदार प्रवीण दरेकर, खासदार नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, कोळी महसंघांचे नेते आमदार रमेश पाटील, आमदार निरंजन डावखरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, माजी आमदार संदीप नाईक, कोळी महासंघाचे नेते अ‍ॅड. चेतन पाटील, शिवसेना नेते विजय चौगुले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, प्रकल्पग्रस्तांच्या घरांची आजूबाजूची जागासुद्धा नियमित होईल. जे शुल्क घेणार आहोत तेदेखील आम्ही कमी केले आहे. बेस रेटच्या कमी पैसे कमी घेणार आहोत. मालकी हक्काने घरे देण्याचा निर्णय घेतला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, एक दिवस रमेश पाटील माझ्याकडे आले व म्हणाले आदेश होत नाही. मी सिडको एमडींना फोन करून सांगितले ज्यांच्या जमिनींवर हे सिडको मंडळ तयार झाले त्यांना तातडीने भूखंड द्या. आम्ही राज्यात रमेश पाटील यांच्या सांगण्यावरून नुकसानभरपाई देण्याची पॉलिसी आणली. वरळी सेतू बांधताना कोळी बांधवांच्या विनंतीवरून स्पॅम वाढवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तातडीने निर्णय घेत कोळी बांधवांना दिलासा दिला. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी इतिहासात पहिल्यांदा कोळी समाजाचा विचार केला. वेगळे खाते तयार झाले. मत्स्यसंपदा योजना आणली. वाढवण बंदरातील प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वात मोठे पॅकेज दिले जाणार आहे.
आमदार गणेश नाईक यांनी रमेश पाटील यांचे कौतुक करताना नवी मुंबईतील ते पहिले उद्योगपती असून त्यांनी समाजासाठी वाहून घेतले असल्याचे म्हटले.
आमदार रमेश पाटील यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र तातडीने मिळावे तसेच प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्क्यांचे उरलेले भूखंड मिळावेत, अशी मागणी केली. यासह वाढवण बंदरातील मच्छीमारांचे संभ्रम दूर करावेत, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मुंबईतील 42 कोळीवाड्यांचे सीमांकन झाले सांगून त्यांचे कौतुक केले. कोळी भवनासाठीही त्यांच्यामुळे भूखंड मिळाल्याचे ते म्हणाले.
आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर मतदारसंघात दोन हजार कोटी निधी आणू शकले, स्मार्ट व्हिलेज करू शकले, प्रकल्पग्रस्त मच्छीमारांना नुकसानभरपाई देऊ शकले, असे सांगून मी तुमची लाडकी बहीण आहे. आशीर्वाद रहावा, असे म्हटले. त्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघांनी हसून प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही दोन भाऊ तुमच्यासोबत आहोत. तुम्ही काळजी करू नका. कार्यक्रमास कोळी बांधव, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

आगामी निवडणुकीतही आमदार प्रशांत ठाकूर यांना विजयी करा -दयानंद सोपटे

तळोजा ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा आपण आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर विश्वास …

Leave a Reply