Breaking News

कर्जत तालुक्यात विंधण विहिरी खोदण्यास परवानगी

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणावत असते. पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या वतीने विंधण विहिरी खोदण्यात येतात. या वर्षी तालुक्यातील 19 ठिकाणी विंधण विहिरी खोदण्यास परवानगी देण्यात आली असून त्यासाठी कर्जत तालुका पाणीटंचाई कृती समितीने 13 लाख रुपयांची तरतूद केली आहे. कर्जत तालुक्यात पाणीटंचाई लक्षात घेऊन दरवर्षी विंधण विहिरी खोदण्याचा कार्यक्रम तयार केला जातो. विंधन विहिरी खोदण्यापूर्वी रायगड जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाचे अधिकारी हे त्या त्या गाव-वाड्यात जाऊन तेथील भौगोलिक परिस्थिती पाहून सर्वेक्षणाचा दाखला देत असतात. यंदा तालुक्यातील पाणीटंचाई असलेली चार गावे आणि 15 आदिवासी वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्याचे काम केले जाणार आहे. त्यासाठी कर्जत तालुका पाणीटंचाई कृती समितीने 75 हजार रुपये एक याप्रमाणे 13 लाख रुपयांची तरतूद करून ठेवली आहे.  कर्जत तालुक्यात या वर्षीच्या पाणीटंचाई कृती आराखड्यात बोन्डेशेत, बलिवरे, गौळवाडी आणि उंबरखांड या चार गावांत, तर फणसवाडी-पिंगळस, फोंडेवाडी, वाघिणीवाडी, तेलंग वाडी, ओलमण कातकरीवाडी, ओलमण चिंचवाडी, कशेळे बेलदारवाडी, पादिरवाडी, भागूचीवाडी, चाफेवाडी, देऊळवाडी, झुगरेवाडी, किरवली, संजय नगर, खांडपे कातकरीवाडी, मोठे वेणगाव कातकरी वाडी आदी 15 वाड्यांत विंधण विहिरी खोदण्यास मंजुरी देण्यात आली आहे. तालुक्यात विहिरी खोल करण्याचे कामेदेखील मंजूर करण्यात आली आहेत. बोंडेशेत गावातील तसेच भडवळ टाकाचीवाडी, भडवळ कातकरीवाडी, वाघिणीवाडी, बेडीसगाव पायथा, भोपळेवाडी, पळसदरी मोठी विहीर यांची दुरुस्ती केली जाणार आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply