नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी जात, धर्म, पंथ असा कोणताच भेदभाव न करता सर्व धर्मातील, सर्व जातीतील मुलांना शिक्षण देऊन गोरगरीबांच्या मुलांच्या आयुष्याचे कल्याण केले. कर्मवीरांचा दृष्टिकोन विशाल होता. त्यांनी आपल्या संस्थेतून मुलांना जातिपातीविरहित शिक्षण देण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्यामुळेच कर्मवीरांच्या शैक्षणिक कार्याची दखल आज देशपातळीवर घेतली जाते, असे प्रतिपादन संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य, माजी खासदार लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी (दि. 23) केले.
रयत शिक्षण संस्थेच्या वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज व मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 137व्या जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपाध्यक्ष जयश्रीताई चौगुले होत्या.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रार्थना फाऊंडेशनकडून होत असलेल्या सामाजिक कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या संस्थेला पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली.
या कार्यक्रमात कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजकडून सोलापूर (मोहोळ) येथील प्रार्थना फाउंडेशनचे संस्थापक प्रसाद मोहिते यांना कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, तर प्रसाद मोहिते यांच्या पत्नी अनु मोहिते यांना सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोख 25 हजार, शाल, सन्मानचिन्ह व मानपत्र असे दोन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त प्रसाद मोहिते यांनी प्रार्थना फाऊंडेशनचा प्रवास आणि कार्य विस्तार मनोगतातून व्यक्त केला. अनु मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शुभदा नायक यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. आबासाहेब सरवदे व प्रा. माया कळविकट्टे यांनी केले. कर्मवीर जयंती सप्ताहातील सर्व कार्यक्रम व उपक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. राजेश्री घोरपडे विशेष प्रयत्न केले.
Check Also
टीआयपीएल रोटरी प्रीमियर लीग उत्साहात
माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बक्षीस वितरण पनवेल ः रामप्रहर वृत्तरोटरी प्रांत 3131मधील …