Breaking News

उसने पैसे मिळविण्यासाठी तरुणाला ठेवले ओलिस

पनवेल : वार्ताहर

उसनवारीने घेतलेली दोन लाख 83 हजार रुपयांची रोख रक्कम परत करण्यास टाळाटाळ करणार्‍या तरुणाला बेदम मारहाण करून त्याला एका खोलीत डांबून ठेवून त्याच्या जवळची रोख रक्कम आणि एटीएम कार्ड लुटणार्‍या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. साहिल नावडेकर आणि अराफत पटेल, असे अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे असून सदरची घटना पनवेलमध्ये  घडली.

या प्रकरणातील तक्रारदार तरुण सागर सावंत (30) हा कामोठे येथे राहण्यास असून, त्याचा आर्किटेक्टचा व्यवसाय आहे. आपल्या व्यवसायानिमित्त सागर सावंत याने आपल्या ओळखीतल्या इरफान नावडेकर याच्याकडून दोन लाख 82 हजाराची रक्कम उसनवारीने घेतली होती, मात्र आर्थिक परिस्थितीमुळे सागरला इरफानचे पैसे परत करता आले नाहीत. त्यामुळे सागर साहिलला वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत होता. त्यामुळे साहिलने खारघर येथे सागरची भेट घेऊन आपली रक्कम परत मागितली, मात्र सागरने काही दिवसांची मुदत मागून घेतली. सदरची रक्कम अराफत पटेल याची असल्याने त्याच्याकडे जाऊन त्याबाबत चर्चा करण्याच्या बहाण्याने साहिलने सागरला आपल्या मोटरसायकलवर पनवेल येथे नेले.

साहिलने सागरला अराफत पटेल याच्या पनवेल महापालिकेजवळ असलेल्या दुकानात नेल्यानंतर अराफत पटेल याने सागरचे दोन्ही हात पकडून ठेवले. त्यानंतर साहिलने सागरच्या खिशात असलेली 45 हजारांची रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली, तसेच त्याच्याजवळ असलेले डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड काढून घेऊन त्याच्याकडून त्याचे पिन नंबर देखील जबरदस्तीने विचारून घेतले. त्यानंतर या दोघांनी जोपर्यंत पैसे देणार नाही, तोपर्यंत न सोडण्याचा, तसेच त्याचे हातपाय तोडून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघांनी सागरला दुकानात कोंडून ठेवून दुकानाला टाळे लावून त्या ठिकाणावरून त्यांनी पलायन केले. दुकानात डांबून ठेवलेल्या सागरने साहिलाला फोन करून सुटका करण्याची विनंती केली, मात्र त्याने त्याचे काही एक ऐकून घेतले नाही. त्यानंतर सागरने घडलेल्या प्रकाराची माहिती रात्री आपल्या बहिणीला फोनवरून दिली. तिने ताबडतोब पनवेल शहर पोलिसांकडे धाव घेऊन पोलिसांसह रात्री 9 वाजता अराफत पटेल याचे दुकान गाठले. तेथे पोहोचल्यानंतर पोलिसांनी दुकानात कोंडून ठेवलेल्या सागर सावंत याची सुटका केली आणि त्यला पोलीस ठाण्यात आणले.  त्यानंतर पोलिसांनी साहिल नावडेकर आणि अराफत पटेल या दोघांवर जबरी चोरीसह, ओलिस ठेवणे व जबरदस्ती वसुली केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे, तसेच पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply