Breaking News

द्रोणागिरीमधील सिडकोच्या बागेत आंबेचोरांचा सुळसुळाट

उरण : प्रतिनिधी

उरण द्रोणागिरी नोडमध्ये शहराजवळ सिडकोच्या मालकीच्या असणार्‍या आंब्याच्या वाडीमधून मोठ्या प्रमाणात आंब्यांच्या फळांची चोरी होत आहे. कुंपणाने शेत खाल्ले ही म्हण सार्थ करीत आंब्यांची चोरी या ठिकाणी सिडकोने नेमलेले सुरक्षा रक्षकच करीत असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या सुरक्षा रक्षकांना उरण द्रोणागिरी नोडच्या कार्यालयातील अभियंत्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद असल्याची चर्चा उरणच्या नाक्या नाक्यावर सुरू आहे.

1970 साली सिडकोने उरण तालुक्यातील 28 गावांची शेतजमीन संपादित केली. यामध्ये मौजे चाणजे परिसरातील जागा संपादित केली होती. या जागेमध्ये इनामदार आणि भिवंडीवाला यांच्या काही जागांचा समावेश होता. या जागेत मोठ्या प्रमाणात आंब्यांची लागवट करण्यात आली होती. 1980च्या दशकात या आमराईची जागा महाराष्ट्र राज्य वीज मंडळाने वायुविद्युत निर्मिती प्रकल्प निर्मितीच्या वेळी या प्रकल्पाची निर्मिती करण्यासाठी आलेल्या जर्मन तंत्रज्ञ व अभियंत्यांना राहण्यासाठी छोटेखानी बंगले बांधण्यासाठी सिडकोकडून मुदतीच्या करारावर घेतली होती. त्या वेळी आंब्याच्या कोणत्याही झाडाला न तोडता या ठिकाणी निसर्गरम्य वातावरणात बंगल्यांची निर्मिती करण्यात आली होती.

प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर व कराराची मुदत संपल्यावर सिडकोने वीज मंडळाकडून ही जागा आहे त्या स्थितीत परत घेतली. त्या जागेस तारांचे कुंपण घालून या जागेत बांधण्यात आलेले बंगले आणि येथे असणार्‍या आंब्याच्या 150 ते 200 झाडाच्या संरक्षणासाठी काही सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली आहे, मात्र हेच सुरक्षा रक्षक आपल्या साथीदारांसह आंब्याच्या हंगामात आंब्यांच्या फळांची मोठ्या प्रमाणात चोरी करू लागले असल्याने कुंपणाने शेत खाल्ले, अशी चर्चा आता या परिसरात जोरदार सुरू आहे. या आमराईतील सुरक्षा रक्षकांना रात्री दारू आणि चकना खाण्यास देऊन शिवाय रोख बक्षिसे देऊन या सुरक्षा रक्षकांना खूश करतात. रात्रभर आंबे खुडून गोणीच्या गोणी आंबे घेऊन हे चोरटे पहाटे रिक्षा, मोटारसायकलवरून पसार होतात. गेली अनेक वर्ष हा प्रकार राजरोजपणे सुरू असून परिसरात हा चर्चेचा विषय बनला आहे.

या ठिकाणी असणारे बहुतांशी सुरक्षा रक्षक हे वेळेवर कामाला हजर राहत नाहीत. तर यातील काही सुरक्षा रक्षक दुसर्‍या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करून दोन दोन पगार घेत असल्याचे समजते. त्यामुळे परिसरात जे बेकार युवक आहेत ते मात्र नोकरीपासून वंचित राहिले आहेत. या बागेतून केवळ आंब्याची चोरी करण्यात येते असे नसून रहदारी नसल्याचा फायदा घेत या बंगल्यांचा उपयोग येथील सुरक्षा रक्षक आणि सिडको अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने अनैतिक कामासाठीसुद्धा करण्यात येत असल्याची चर्चा ऐकावयास मिळते. सिडकोने ही आंब्याच्या बागेसह जागा स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी याचे टेंडर काढून 5 किंवा 3 वर्षाच्या करारावर खाजगी व्यक्तीकडे सोपविले, तर झाडांची निगा, जागेची स्वच्छता आणि राखण मोफत होऊन सुरक्षा रक्षकांवर होणारा खर्चही वाचेल. शिवाय येथील फळांच्या विक्रीतून सिडकोला मोठ्या प्रमाणात महसूल मिळेल. अशा पद्धतीवर उरणमधील अनेक सरकारी जागांमध्ये असणार्‍या आंब्याच्या जागा या तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. सिडकोच्या मालकीच्या या आंब्याच्या बागेतून दैनंदिन हजारो फळांची चोरी होत असल्याची चर्चा आता केवळ उरणच्या नाक्या नाक्यावर होत नसून संपूर्ण तालुक्यात सुरू झाली आहे. या आंबे चोरांबाबत सिडको अधिकारी नेमका कोणता निर्णय घेतात की तेरी भी चूप मेरी भी चूप म्हणत गप्प बसतात. याबाबत सर्व उरणवासीयांचे लक्ष या द्रोणागिरी नोडमधील आंब्याच्या बागेकडे लागले आहे.

Check Also

महायुतीचे उमेदवार खासदार बारणेंच्या प्रचारार्थ खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य रोड शो

पनवेल : रामप्रहर वृत्त महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी खारघरपासून ते कळंबोलीपर्यंत भव्य …

Leave a Reply