पनवेल : वार्ताहर
खारघर येथे भाड्याने घेतलेला टँकर व त्याचे भाडे न देता तब्बल आठ लाख रुपयांचा अपहार केल्याचा गुन्हा आरोपी विरोधात दाखल करण्यात आला आहे. गुरुनाथ मोतीराम पाटील (वय 45 वर्षे) यांचा दूध विक्रीचा व्यवसाय असून ते मदर डेरी येथील कंपनीमधून दूध घेऊन नेहमीप्रमाणे मानखुर्द, चेंबूर, गोवंडी येथे जाऊन माल विक्री धंदा करतात.
एमएच 11 ए जी 8585 हा टँकर दिलीप काजळे यांना देण्यात आला व त्या करारामध्ये 20 हजार रुपये दरमहा भाडे तत्त्वावर टँकर देण्याचे पाटील व काजले यांच्यात ठरले होते. सुरुवातीच्या महिन्यात त्याने भाडे वेळेवर दिले. त्यानंतर त्याने दर महिन्याला ठरल्याप्रमाणे पैसे दिले नाही व वेगवेगळी कारणे देऊ लागला, तसेच कराराप्रमाणे पैसे व टँकरही परत दिला नाही. त्यामुळे ठरलेले भाडे, तसेच टँकर परत न दिल्यामुळे दिलीप अर्जुन काजळे (कोल्हापूर) याने एकूण आठ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्याच्यावर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
– चप्पलच्या स्टँण्डने केली मारहाण
पनवेल : वार्ताहर
घरगुती वादातून कामोठे येथे एका जावयाने सासर्याच्या अंगावर चप्पलचे स्टिलचे स्टँण्ड फेकून मारले. यात त्यांच्या डोक्याला जखम झाली असून कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लहू विष्णू लबडे (वय 69 वर्षे) असे जखमीचे नाव आहे.
लहू विष्णू लबडे यांच्या मुलीचे 2011 मध्ये विजय शिवाजी इंदळकर (रेल्वे पोलीस) याच्याशी लग्न झाले आहे. त्यांना सात वर्षाचा मुलगा असून काही वर्षापासून मुलगी व जावई यांच्यात वाद सुरू आहेत. विजय हे घरी येऊन पत्नी व मुलास शिवीगाळ करून मारण्याची धमकी देतात. त्यावर कामोठे पोलीस ठाणे येथे अदखलपात्र गुन्हे नोंद केले आहेत.
विजय इंदळकर हे मुलाला घेण्यासाठी आले होते. या वेळी त्यांनी जोरजोरात आरडाओरडा करून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांना विरोध केला असता इंदळकर यानी दरवाजा बाहेर असलेल्या स्टिलचे चप्पल स्टँण्ड उचलून लहू यांना फेकून मारले. त्यात लबडे यांच्या डोक्यास दुखापत झाली. पोलिसांनी विजय शिवाजी इंदळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
– लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक
पनवेल : वार्ताहर
खारघरमध्ये राहणार्या तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या व्यक्तीला खारघर पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य नाईक (35) असे या व्यक्तीचे नाव असून महिन्याभरापूर्वी खारघर पोलिसांनी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणातील पीडित तरुणी व तिच्यावर लैगिक अत्याचार करणारा आरोपी आदित्य नाईक हे दोघेही खारघरमध्ये राहण्यास असून 2012 मध्ये या दोघांची ओळख झाली होती. त्या वेळी पीडित मुलीचे वय 17 होते. त्या वेळी आरोपीने पीडित मुलीसोबत मैत्री वाढवून तिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण केले. त्यानंतर त्याने तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, तसेच त्याने पीडित मुलीकडून सात लाख 50 हजार रुपये देखील उकळले. दरम्यानच्या काळात आरोपी आदित्य नाईक हा विवाहित असल्याचे, तसेच त्याला एक मुलगा असल्याचे पीडित तरुणीला समजल्यानंतर पीडित तरुणीने त्याच्याशी संबध तोडून टाकले, मात्र त्यानंतर देखील आरोपी आदित्य हा पीडित तरुणीच्या पाठीमागे लागला होता. त्यामुळे पीडित तरुणीने गत महिन्यात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याची पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.