Breaking News

युवकांनो ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे उद्घाटन

नवी मुंबई : बातमीदार
देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणार्‍या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी सजग राहा, सैनिक म्हणून पुढे या. हीदेखील एक प्रकारची देशभक्ती आणि समाजाची सेवा आहे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 8) येथे केले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित वाशी येथील सिडको ऑडिटोरियममध्ये नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास वनमंत्री गणेश नाईक, प्रख्यात अभिनेता आणि नशामुक्त नवी मुंबई या उपक्रमाचा आयकॉन जॉन अब्राहम, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार मंदा म्हात्रे, आमदार विक्रांत पाटील, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे, संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे, प्रशांत मोहिते, रश्मी नांदेडकर, संजयकुमार पाटील, महाविद्यालयीन विद्यार्थी, नशामुक्तीचे काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ड्रग्समुळे स्वतःच्या आयुष्यासोबत आपण देशाचेही नुकसान करतो हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. प्रवाहासोबत जाणारे अनेक असतात, परंतु चांगले करण्यासाठी प्रवाहाविरुद्ध जावे लागते. त्याकरिता शारीरिक ताकदीपेक्षा मानसिक ताकद गरजेची आहे. नशामुक्त नवी मुंबई हे अभियान अतिशय महत्त्वाचे आहे. गृह खात्याच्या पहिल्याच बैठकीत पोलिसांना सांगितले की, आपल्याला ड्रग्सविरुद्ध मोठी लढाई लढायची आहे. सरळ लढाई करता येत नाही म्हणून अमली पदार्थांच्या देश पोखरण्याचा प्रयत्न केला जातोय.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुढे म्हटले की, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी गृह विभागासंबंधी घेतलेल्या बैठकीत कॅनडाचे उदाहरण दिले. ड्रग्जमुळे कॅनडा सामाजिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडून पडला, मात्र भारत ड्रग्जविरुद्धची ही लढाई जिंकू शकतो. देशातील सर्व राज्यांनी एकमेकांना सहकार्य करीत ही लढाई एकत्र लढायला हवी. सर्वांनी एकत्र येऊन संपूर्ण भारत ड्रग्समुक्त करायचा आहे, हा आपला निर्धार असायला हवा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या 8828112112 या टोल फ्री क्रमांकाचा प्रभावी वापर करा.
नशामुक्तीसाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल मुख्यमंत्र्यांनी नवी मुंबई पोलीस दलाचे अभिनंदन केले तसेच सेलिब्रिटी म्हणून जॉन अब्राहम यांच्या कामाबद्दलही कौतुक केले आणि पुन:श्च एकदा निर्धार करूया नशामुक्तीसाठी लढण्याचा, ड्रग्स फ्री नवी मुंबई करण्यासाठी सैनिक होण्याचे उपस्थितांना आवाहन केले.
वनमंत्री गणेश नाईक म्हणाले की, चांगल्या कामाचा ध्यास हीच खरी नशा आहे. सर्वांनी चांगल्या कामाचा ध्यास घ्यावा. नवी मुंबई महापालिका सर्व आघाड्यांवर प्रथम क्रमांकावर आहे तसेच नशामुक्त अभियानातही अव्वल राहील, असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात रिझल्ट ओरिएंटेड महाराष्ट्र घडेल, असा विश्वास व्यक्त केला.
अभिनेता जॉन अब्राहम याने आपल्या मनोगतात नशामुक्त नवी मुंबई या अभियानाच्या आयोजनाबद्दल नवी मुंबई पोलिसांचे अभिनंदन करून आपले आयुष्य हे शिस्तमय असावे. आपण आपल्या आचरणाने मित्र परिवारामध्ये आदर्श निर्माण करावा आणि एक उत्तम नागरिक म्हणून जगावे, असे आवाहन उपस्थित युवकांना केले.
सुरुवातीस नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी प्रास्ताविकात नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने आतापर्यंत राबविलेल्या विविध उपक्रमांची थोडक्यात माहिती दिली.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांनी संस्कृतमधून घेतली विधानसभा सदस्यत्वाची शपथ

मुंबई ः रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजयी झालेले आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Leave a Reply