Breaking News

राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडली, देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल, महाविकास आघाडीवर शरसंधान

नागपूर : प्रतिनिधी

नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला करण्यात आला. दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी महापौरांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून गोळ्या झाडल्या. या हल्ल्यातून महापौर जोशी थोडक्यात बचावले. नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्था बिघडल्याचा आरोप करीत महाविकास आघाडी सरकारवर बुधवारी (दि. 18) हल्लाबोल केला.

हिवाळी अधिवेशनाच्या तिसर्‍या दिवशी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. अभिभाषणावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर निशाणा साधला. हे सरकार जनतेच्या मनातील नाही. जनतेने निवडून दिलेले सरकार नाही, तर राजकीय कपटाने व स्वार्थापोटी आलेले सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

जनतेने आम्हाला नाकारले नाही. जनतेने भाजपला कौल दिला होता. 1990नंतर दोन वेळा 100पेक्षा जास्त जागा मिळवणारा पक्ष भाजप ठरला आहे. जनतेने महायुतीला कौल दिला होता, मात्र आमच्यासोबत निवडणूक लढवणारा पक्ष दुसर्‍यांसोबत गेला, असे सांगून फडणवीस म्हणाले की, हे सरकार कोणत्या दिशेने जाणार ते दिसत आहे. सरकारमधील तीन पक्षांत विसंवाद आहे.

या सरकारमध्ये असलेल्या पक्षांनी 23 हजार कोटींची मदत देण्याची मागणी केली होती. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना हेक्टरी 25 हजार, तर फळबागायतदारांना हेक्टरी 50 हजार मदतीची मागणी केली होती, मात्र सत्तेत आल्यानंतर अजूनही शेतकर्‍यांना मदत मिळाली नाही. आमचे काळजीवाहू सरकार असताना मदतीची तरतूद केली होती, याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधले.

सत्ताधारी कुचकामी व निष्क्रिय

संविधानाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी 12 मंत्री असायला हवे होते, पण केवळ सहाच मंत्री आहेत. तरीही आम्ही आक्षेप घेतला नाही. कारण शेतकर्‍यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र ती अजून मिळालेली नाही. सरकारने शेतकर्‍यांची निराशा केली आहे. हे सरकार काम करीत नाही. कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली. याआधी फडणवीस यांनी केंद्राच्या जीवावर मदतीची घोषणा केली होती का, असा प्रश्न विचारला होता.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply