Breaking News

उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू

कर्जत ः प्रतिनिधी

शेलू गावातील केबिकेनगरमध्ये राहणारे रहिवासी उल्हास नदीत पोहण्यासाठी गेले असता त्यातील दोघांचा बुडून मृत्यू झाला. उल्हास नदीत पोहण्यासाठी गेल्यानंतर बुडण्याच्या घटनांत सातत्याने वाढ होत आहे. शेलू गावात सातत्याने पाण्यात बुडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. मंगळवारी उल्हास नदीतपात्रात पोहायला गेलेला तांबे कुटुंबातील आयुष हा 14 वर्षांचा मुलगा पाण्यात उडी मारल्यानंतर तळाशी गेला. त्याला शोधण्यासाठी त्यावेळी तेथे असलेले शंकर काळे यांनी पाण्यात उडी मारून आयुषला शोधण्याचा प्रयत्न केला. या वेळी शंकर काळे पाण्यातून बाहेर येत नाही हे बघून आयुषचे वडील सूर्यकांत तांबे यांनीही उल्हास नदीच्या डोहात उडी घेतली. सूर्यकांत तांबेदेखील पाण्याबाहेर येत नसल्याचे बघून तेथे असलेल्या महिलांनी आपल्याकडे कपडे धुण्यासाठी आणलेल्या साड्या पाण्यात सोडल्या. त्यांना पकडून तांबे सुखरूप बाहेर आले, मात्र आयुष आणि शंकर काळे यांचा बुडून मृत्यू झाला असून त्यांचा शोध घेण्यासाठी शेलू गावच्या पोलीस पाटलांनी घटनास्थळी जाऊन आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने शोध सुरू केला. आयुषचा मृतदेह 10 फूट खोल पाण्यातून बाहेर काढण्यात आला असून घटनास्थळी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र शेडगे तसेच पोलीस कर्मचारी वैशाली परदेशी आणि अशोक पाटील हजर झाले. उल्हास नदी परिसरात 200-300 फुटांचा परिसर शोधल्यानंतर तब्बल सहा तासानंतर दुसरा मृतदेह शोधण्यात यश आले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply