Breaking News

रुग्णालयांचा सेवाविस्तार; नवी मुंबईत नववर्षापासून होणार प्रारंभ; आयुक्तांकडून रुग्णालयाची पाहणी

नवी मुंबई ः प्रतिनिधी

नेरूळ व ऐरोली येथील रुग्णालयांच्या इमारतीत सर्वसाधारण रुग्णालय सुरू करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कार्यवाही सुरू केली आहे. त्या अनुषंगाने संबंधित विभागाला दिलेल्या निर्देशांचे पालन झाले की नाही याची तपासणी करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सोमवारी (दि. 21) नेरूळ येथील रुग्णालयाच्या इमारतीला अचानक भेट देऊन पाहणी केली. ऐरोली आणि नेरूळ येथील रुग्णालयाच्या इमारतीत 1 जानेवारीपासून आयसीयू व मेडिसीन वॉर्ड सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाला काही सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी झाली की नाही याची तपासणी बांगर यांनी या वेळी केली, तसेच सध्या सुरू असलेल्या आरोग्यसेवांची पाहणी करताना या ठिकाणी नेत्रचिकित्सा, कान-नाक-घसा तपासणी, त्वचाविकार, मानसोपचार, मेडिसीन या बाह्यरुग्ण सेवाही सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यानुसार 1 जानेवारीपर्यंत या बाह्यरुग्ण सेवाही सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता करण्याचे निर्देश त्यांनी आरोग्य विभागाला दिले आहेत. ऐरोलीप्रमाणेच नेरूळ रुग्णालयातही कोविडपश्चात उपचार केंद्र सुरू असून त्याची माहिती नागरिकांना होण्यासाठी व्यापक स्वरूपात प्रसिद्धी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी कोरोना संसर्गानंतर वैद्यकीय सेवेची गरज असणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अशा नागरिकांसाठी महापालिकेची उपचार सेवा उपलब्ध असल्याची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. या पाहणी दौर्‍यात काही फायर एक्स्टिंग्युशर या अग्निशमन उपकरणाचा वापर कालावधीची मुदत उलटून गेल्याचे निदर्शनास आले. याविषयी आयुक्त बांगर यांनी त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. बालरोग वॉर्डमध्ये दाखल होणारी रुग्णसंख्या कमी दिसत असून अधिक चांगल्या रुग्णसेवेवर भर देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या वेळी 15 दिवसांत अभिलेख अधिनियमानुसार रेकॉर्ड रूम अद्ययावत करण्याचे निर्देशही देण्यात आले. 1 जानेवारीला पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी 15 बेड्सचे मेडिकल वॉर्ड व 10 बेड्सचा आयसीयू वॉर्ड सुरू करण्यासाठी आवश्यक ती संपूर्ण कार्यवाही करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधीक्षकांवर सोपविण्यात आली आहे, तसेच दुसर्‍या टप्प्यात 1 फेब्रुवारीपासून सर्जिकल वॉर्ड व सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया सुरू करण्याचेही नियोजन असल्याचे आयुक्त बांगर यांनी या वेळी स्पष्ट केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply