Breaking News

हरविलेल्या मुलीचा दोन तासांत शोध

दादर सागरी पोलिसांची कामगिरी

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील हमरापूर गावात वीटभट्टी कामासाठी आलेल्या कुटुंबासोबतची 11 वर्षीय निकिता नाईक हरविल्याची तक्रार दादर सागरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या मुलीला दोन तासांत शोधण्यात दादर सागरी पोलिसांना यश आले आहे.

पेण तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीटभट्टीचे उत्पादन सुरू असते. यासाठी दरवर्षी हिवाळा सुरू झाल्यानंतर बाहेरील जिल्ह्यांतील अनेक कुटुंबे येतात. अलिबाग तालुक्यातील खंडाळा गावातील नितीन नाईक कुटुंब वीटभट्टी कामासाठी हमरापूर गावात आले आहे. त्यांचे वीटभट्टीचे कामही सुरू आहे. रविवारी (दि. 24) संध्याकाळी त्यांची मुलगी निकिता नाईक खाऊसाठी हमरापूर गावात गेली होती. तिला उशिरा झाल्याने वडील तिला ओरडले. त्यामुळे ती रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रागाने घरातून निघून गेली. रात्री 11 वाजले तरी मुलगी घरी न आल्याने आई शांता नाईक यांनी थेट जोहे गावातील दादर सागरी पोलीस स्टेशन गाठत मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली.

 दरम्यान, मुलगी हरविल्याची तक्रार दाखल होताच दादर सागरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक के. आर. भऊड, सहाय्यक फौजदार शिवाजी म्हात्रे, हवालदार रवी मुंडे, जगताप, होमगार्ड आदेश पाटील, करे यांच्या पथकाने कल्पेश ठाकूर यांच्या सहकार्याने हमरापूर जंगल भागात शोध सुरू केला, मात्र घरी गेल्यास वडील मारतील या भीतीने निकिता झाडांमागे घाबरून लपून बसलेली सापडली. तिला ताब्यात घेत धीर देऊन सुखरूप आईच्या ताब्यात देण्यात आले.

रात्रीच्या अंधारात फक्त दोन तासांत मुलीला शोधल्याने दादर सागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पोलीस कर्मचारी व देवदूत कल्पेश ठाकूर यांचे नाईक परिवार व ग्रामस्थांकडून आभार मानण्यात आले.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply