बीड : प्रतिनिधी
गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. कृष्णा खोर्याचे हक्काचे पाणी मराठवाड्यात मिळणे आणि वाटर ग्रीडची अंमलबजावणी ही कामे प्राधान्याने करू. तसेच राज्यातील दुष्काळाची काळजी करू नका त्यासाठी शासनाचा खजिना रिता करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील गोपीनाथ गड येथे दिली.
परळी तालुक्यातील पांगरी येथील गोपीनाथ गडावर लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पाचव्या स्मृतिदिनी समाधीस्थळाचे दर्शन घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच अनुयायांची गर्दी झाली होती. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मराठवाड्यातील सेना-भाजप युतीच्या नवनियुक्त खासदारांचे स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील भाजपच्या यशात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा आहे. मुंडे-महाजन यांच्या पायाभरणीमुळे राज्यात पक्षाला चांगले यश मिळाले. आम्हाला गोपीनाथ मुंडे यांनी घडवले आहे. तसेच पंकजा आणि प्रीतम मुंडे या सामान्यांसाठी काम करत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न साकारत आहेत, असेही ते म्हणाले.
मराठवाडा दुष्काळमुक्त करू
गोपीनाथ मुंडे यांचे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. यासाठी वाटर ग्रीड आणि कृष्णा खोर्याचे पाणी मराठवाड्यात आणणे असे प्रकल्प मराठवाड्यात राबविण्यात येणार आहेत. सध्या मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला असून या दुष्काळाला घाबरण्याचे कारण नाही. दुष्काळ निवारणासाठी शासनाच्या खजिना रिता करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
दुष्काळामुळे माणसाला जीवन जगणे असह्य झाले आहे. पाणीटंचाई भासू नये यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. यापुढेही मराठवाड्यात धरणे बांधून व कृष्णाचे पाणी मराठवाड्यात आणून हा भीषण दुष्काळ दूर करण्यात येईल. याकामी शासनाला नक्कीच यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यावर गोपीनाथ मुंडे यांचे प्रेम होते. मराठवाड्याच्या विकाससाठी गोपीनाथ मुंडे यांनी अहोरात्र मेहनत घेतली. गोपीनाथ मुंडेंमुळेच भाजपला हे चांगले दिवस आले आहेत, असे ते म्हणाले.