पनवेल : रामप्रहर वृत्त
अंजुमन-ए-इस्लाम या सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेच्या एन.बी.ए. मानांकित पनवेल येथील अब्दुल रझाक काळसेकर पॉलिटेक्निकद्वारे नुकतेच दहावी, बारावी आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क करीअर मार्गदर्शनपर ऑनलाइन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास विद्यार्थी वर्गातून उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद लाभला.
अंजुमन-ए-इस्लाम संस्थेच्या नवी मुंबई शिक्षण संस्थांचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन बुर्हान हारीस यांच्या अध्यक्षतेत तसेच संस्थेचे शालेय समिती सदस्य इक्बाल कवारे, शोएब जामखानवाला, काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. अब्दुल रझाक होनुतागी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमात अनेक शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
विशेष मार्गदर्शक मुंबईचे डीटीई जे. आर. नीखाडे, विशेष कर्तव्याधिकारी वाय. बी. जामनिक, सदफ शेख, रिलायन्स जिओचे डॉ. मुनीर सय्यद यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांना इ- प्रमाणपत्रही देण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर आय. काझी व जनरल सेक्रेटरी जी. ए. आर. शेख यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमास काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. रमझान खाटीक यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले.