बांधकामात पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर नसणे, सांडपाणी शुद्धिकरण व पुनर्वापर न होणे, उन्हाळ्यात सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून घराचे रक्षण न होणे तसेच घरात नैसर्गिक वायुव्हिजन न होणे, शहरात मोठ्या प्रमाणावर तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलनिस्सारण योजनेत सोडणे बहुधा पुरेसे होत नाही वा त्या यंत्रणेस मर्यादा असतात.
एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरातील अनेक इमारतींचेही असे झाल्याने शहराची सर्व सुविधा यंत्रणाच कोलमडून पडते. याशिवाय जुन्या इमारती पाडून नव्या इमारतींचे काम सुरू असते. यामुळे धूळ, ट्रकसारख्या अवजड वाहतुकीचा ताणही व्यवस्थेवर असतो. प्रचंड बांधकामामुळेही शहराचे मूळ रूप नष्ट होऊन त्याला कॉँक्रिटच्या जंगलाचे रूप येते. परिणामी सर्व प्रकारचे प्रदूषण व पर्यायाने पर्यावरणाला हानी पोहचते. यामुळे ग्रीन बिल्डिंग संकल्पना आवश्यक आहे.
-सूर्याच्या उष्णतेपासून घराचे संरक्षण
खिडकी छतालगत ठेवली जाते. त्यामुळे प्रकाश छतावरून घरभर परावर्तीत होतो. छतावर किंवा गच्चीत पाणी साठवण्याची सोय केलेली असते. यामुळे घर दिवसा थंड तर रात्री गरम राहते. याचप्रमाणे बाहेरच्या बाजूस सावली देणारी झाडे असणे फायदेशीर असते. पडदे, व्हरांडा, उतरते छप्पर यामुळे थेट सूर्यप्रकाश रोखला जातो. मात्र, आवश्यक तेवढा सूर्यप्रकाश, उष्णता मिळते. यामुळे नैसर्गिक वायुव्हिजनाचा दुहेरी फायदा होतो. त्यामुळे गारवा येतो व घरातील बांधकाम घटकही थंड राहतात. घराचे डिझाइन असे केले जाते की गरम हवा वर जाते व नैसर्गिक वायुव्हिजनामुळे घरातील तापमान थंड व सुखकर राहते. घरातील फरशीखाली पाणी साठवण्याची सोय केल्यास त्याचीही तापमान थंड ठेवण्यास मदत होते. बाहेरील बाजूस व्हरांडा ठेवल्यास थेट भिंतींवर ऊन पडत नाही. उष्णतारोधक काचामुळेही येणारी अतिरिक्त उष्णता थोपवता येते. स्लॅब व बाहेरील भिंतीना प्रकाश परावर्तक पांढरा रंग दिल्यास उन्हाळ्यात हे जास्त उपयोगी आहे. यामुळे 60 ते 70 टक्के उष्णतेचे परिवर्तन होऊन ती परत वातावरणात सोडली जाते. यामुळे 2 ते 3 अंशांनी घरातील तापमान कमी होते.
बांधकामात पर्यावरणपूरक वस्तू म्हणून बांबू, ज्यूट व कापड यापासून बनवलेल्या वस्तू, उन्हात वाळवलेल्या विटा, प्रीकॉस्ट सिमेंट काँक्रिट ब्लॉक, तुळ्या, स्लॅब, सच्छिद्र वा पोकळ काँक्रिटचे ब्लॉक, सिमेंटचा रंग, मातीची कौले, फ्लाय अॅशच्या विटा असे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत. हवेचे म्हणजे वायुप्रदूषण टाळण्यासाठी बाष्पशील सेंद्रिय पदार्थ (व्हीओसी) नसणारे रंग वापरा, पाण्याची ओल व गळतीमुळे बुरशी व जिवाणूची वाढ होते यासाठी योग्य जलावरोधक वापरावेत. फ्लाय अॅश, टाइल्सचे तुकडे व पुनर्वापर करता येणार्या वस्तूंचा बांधकामात वापर करावा.
-सांडपाणी शुद्धिकरण व पुनर्वापर
मुळात घरी पाणी कमी वापरून पाण्याची बचत केली तर आपोआपच सांडपाणीही कमीच तयार होते. यासाठी ड्युअल फ्लश तसेच पाण्याचा प्रवाह आपोआप बंद होणारे वॉशबेसीन व पॅरीचे अजिबात पाणी न लागणार्या (वॉटरलेस) युरिनल वापरल्यास पाण्याची बचत करता येते. तरीही सांडपाणी थोडे तरी तयार होणारच. त्यासाठी सांडपाणी शुद्धिकरणासाठी वाळूचा थर असणारी टाकी बांधली व त्यात पाणवनस्पती लावल्या तर सांडपाण्यातील सर्व दूषित द्रव्यांवर प्रक्रिया होऊन सांडपाणी शुद्ध होते व ते बागेसाठी वापरता येते. यामुळे सांडपाणी निचरा करण्याची समस्या राहत नाही.