अरबी समुद्रातील चक्रीवादळांनी तुलनेने कमी हानी होते. परंतु तरीही या स्वरुपाची नैसर्गिक आपत्ती वारंवार येत असल्यामुळे त्यादृष्टीने सज्जता राखणे व काळानुरुप त्यात अधिकाधिक चांगले बदल करत राहणे जबाबदार प्रशासनाकडून अपेक्षितच आहे. भारताला लाभलेली 7600 किमीची मोठी किनारपट्टी लक्षात घेता हे आव्हान सोपे नाही. वायु चक्रीवादळाने दिशा बदलल्याची बातमी गुरुवारी दुपारपर्यंत आल्याने गुजरातने सुटकेचा नि:श्वास सोडला. तरीही वादळी वार्यांचा जोर कायम राहणार असल्याने गुजरातसह महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील भागातही सावधानता बाळगण्याचा इशारा कायम ठेवण्यात आला. आत्यंतिक तीव्रतेचे वायु चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणार नसल्याचे गुरुवारी दुपारपर्यंत स्पष्ट झाले. जमिनीऐवजी हे चक्रीवादळ वायव्येला समुद्राच्या दिशेने सरकू लागल्याने त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता स्कायमेट या खाजगी हवामान कंपनीनेही व्यक्त केली. तत्पूर्वी खबरदारीची उपाययोजना म्हणून गुरुवारी सकाळीच गुजरातमध्ये तब्बल तीन लाख लोकांना किनारपट्टीवरील भागांतून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते. दुपारपर्यंत गुजरातच्या किनारपट्टीवरील द्वारका आणि वेरावळ दरम्यान हे वादळ धडकेल अशी शक्यता आधी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे दोन दिवस गुजरातमध्ये शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले होते. मध्यरात्रीपासूनच राज्यातील विमान वाहतूकही 24 तासांसाठी बंद ठेवण्यात आली. तसेच समुद्री वाहतूकही संस्थगित करण्यात आली. वायु चक्रीवादळामुळे जे काही नुकसान होईल, त्याची भरपाई करण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरि मदत दिली जाईल असे दिलासादायक आश्वासनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. परंतु तंत्रज्ञानामुळे हे चक्रीवादळ निर्माण झाल्यापासून त्याची हरएक टप्प्यावरची हालचाल टिपण्यात यश आले आणि केंद्र तसेच राज्य सरकारी यंत्रणेने परस्परांशी समन्वय राखून वेळेवर सर्व दक्षता घेतल्यामुळे या वादळामुळे होणारे नुकसान हे कमीत कमी असणार आहे. वायु वादळाचा थेट फटका कोकण किनारपट्टीला बसला नसला तरी त्याचे परिणाम मात्र बुधवारी किनारपट्टीवर दिसून आले. हे लक्षात घेऊन अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन आणि उरण तालुक्यातही नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला होता. अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रे उडाले, झाडेे पडली वा पावसाचे पाणीही साचले. मुरुडच्या खोरा बंदरात लाटांचे तांडव उसळलेले पहायला मिळाले. परंतु तंत्रज्ञानाच्या जोडीला तितक्याच तत्पर प्रशासकीय यंत्रणेची साथ लाभल्याने हानी मर्यादित ठेवण्यात गुजरातसह महाराष्ट्रातही यश आले. सावधानतेचा इशारा देण्याबरोबरच काही घरांतील कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतरही करण्यात आले. मुंबईत चर्चगेट येथे मात्र होर्डिंग कोसळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही एवढी एक घटना वगळता उपग्रहीय तंत्रज्ञानामुळे चक्रीवादळाला तोंड देण्याची सारी दक्षता महाराष्ट्रातील प्रशासनानेही बाळगलेली दिसून आली. वादळाने दिशा बदलल्याने दोन्ही राज्यांतील जनतेने सुटकेचा नि:श्वास टाकला असून प्रशासकीय यंत्रणा किती उत्तम रीतीने वादळाला तोंड देण्याची तयारी करू शकते हे या संकटाच्या निमित्ताने दिसून आले आहे.
Check Also
शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित
पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …