माणगाव : प्रतिनिधी
पाटबंधारे विभागाने साफसफाईची कामे व्यवस्थित न केल्यामुळे डोलवहाळ बंधार्याच्या डाव्या कालव्याचे पाणी माणगाव तालुक्यातील अनेक गावांना मिळत नाही. त्यामुळे या गावांच्या परिसरातील उन्हाळी भातपीक धोक्यात आले आहे. या प्रकाराने संतप्त झालेल्या देगाव येथील शेतकर्यांनी शुक्रवारी (दि. 28) दुपारी माणगाव येथील पाटबंधारे कार्यालयात जाऊन सहाय्यक अभियंता श्री. भाट यांना धारेवर धरले. शेतकर्यांचे हे रूप पाहून अधिकार्यांची झोप उडाली.
भिरा येथील टाटा जलविद्युत केंद्रातून वीजनिर्मितीनंतर वर्षाकाठी उपलब्ध होणार्या 103 दशलक्ष घनमीटर पाण्याचा सिंचनासाठी वापर होतो. त्यासाठी रोह्यातील कुंडलिका नदीवर काळ प्रकल्पांतर्गत डोलवहाळ येथे बंधारा बांधण्यात आला. या बंधार्यावर डावा व उजवा कालवा आहे. डाव्या कालव्यातील पाणी 15 डिसेंबर ते 15 एप्रिल या कालावधीत माणगावमधील शेतीला सोडण्यात येते.
पावसाळ्यात कालव्यात मोठ्या प्रमाणात माती, दगड, गाळ साचतो. शेवाळ व झाडेझुडपेही वाढतात. त्याच्या सफाईची कामे पाटबंधारे विभागाला करावी लागतात. त्याचबरोबर भराव करणे, खांडी भरणे आदी कामेही केली जातात. यंदा पाटबंधारे विभागाने नोव्हेंबर 2019मध्ये कालव्याच्या सफाईची कामे हाती घेतली होती, मात्र कामे थातूरमातूर झाल्याचे परिसरातील शेतकर्यांचे म्हणणे आहे.
यंदाही 15 डिसेंबर 2019पासून डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले, मात्र पाटबंधारे विभागाने कालव्याच्या साफसफाईची कामे थातूरमातूर केल्याने माणगावातील निळगुन, नाइटने, देगाव, सुर्ले, बोर्ले, मोर्बा, राजिवली, सुराव या गावांत कालव्याचे पाणी आले नाही. पाणी नसल्याने तेथील भातपीक जळू लागले. त्यामुळे संतप्त झालेल्या देगाव येथील अनिकेत ठाकूर, सुरेश गायकवाड, काशिनाथ गायकवाड, अशोक महामुणकर, विठोबा परबळकर, रामदास महाडिक, मनोज परबळकर, विलास कदम, नथुराम गायकवाड, नितीन गायकवाड, नितेश गायकवाड यांसह अनेक शेतकर्यांनी शुक्रवारी माणगावमधील पाटबंधारे कार्यालयावर धडक देत कालव्याच्या पाण्यासंदर्भात जाब विचारत सहाय्यक अभियंता श्री. भाट यांना धारेवर धरले.
– डोलवहाळ बंधार्यावरून धडक डोलवहाळ बंधार्यावर डावा आणि उजवा कालवा आहे. उजव्या कालव्यातून रोहे तालुक्यातील, तर डाव्या कालव्यातील पाणी माणगाव तालुक्यातील शेतीला सोडण्यात येते. दोन्ही तालुक्यांतील सुमारे सात हजार 936 हेक्टर जमीन ओलिताखाली येते. गेल्या वर्षी डाव्या कालव्याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यातील 1248 हेक्टर क्षेत्रामध्ये भातशेती, फळबागा व कलिंगडे, भाजीपाला पीक घेण्यात आले होते, मात्र कालव्याचे पाणी व्यवस्थितपणे येत नसल्याने शेतकर्यांनी पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली.