अधिकार्याला क्वारंटाइन केल्याने वाद
मुंबई : प्रतिनिधी
बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाला एक वेगळे वळण लागले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात 35हून अधिक जणांची चौकशी केल्यानंतरही सुशांतच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. अशातच या प्रकरणाच्या तपासासाठी बिहारमधून आलेले आयपीएस अधिकारी विनय तिवारी मुंबईत दाखल होताच महापालिकेने त्यांना क्वारंटाइन केले. यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी रविवारी मुंबईत दाखल झालेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना महापालिकेने क्वारंटाइन केले. कोणत्याही प्रकारचे नमुने तपासणीसाठी न घेता 14 दिवस क्वारंटाइन करण्यात आल्याचे त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. तिवारी पुढे म्हणाले की, मुंबईतील एका गेस्ट हाऊसमध्ये मला क्वारंटाइन करण्यात आले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तपास पथकाच्या मी संपर्कात आहे.
दुसरीकडे या आत्महत्या प्रकरणात तपास कुठवर आला आहे, आतापर्यंत किती व कोणाचे जबाब नोंदविले गेले यांसारख्या मुद्द्यांवर मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी (दि. 3) पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
दरम्यान, आयपीएस अधिकारी विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने सक्तीनेक्वारंटाइन केल्याने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा मुद्दा बिहार विधानसभेतही गाजला. आमदार नीरजसिंह बबूल यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी केली. राजदचे आमदार तेजस्वी यादव यांनी या मागणीचे समर्थन केले.