Breaking News

कर्जत पंचायत समितीकडून पाणीटंचाईग्रस्त भागांची पाहणी

टँकर व्यवस्थेची कार्यवाही सुरू

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. तालुक्यात 57 आदिवासी वाड्या आणि 24 गावे पाणीटंचाईग्रस्त असून सर्व टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमधील ग्रामस्थांकडून टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे. मे महिना सुरू होत असताना पाण्याची स्थिती जाणून घेण्यासाठी कर्जत पंचायत समितीचे पथक लॉकडाऊन आणि कोरोनाचे संकट असूनही पाणीटंचाईग्रस्त भागात पोहचले. दरम्यान, पाणीटंचाईग्रस्त भागात टँकरची कार्यवाही सुरू केल्याची माहिती गटविकास अधिकारी बाळाजी पुरी यांनी दिली. कर्जत तालुक्यात दरवर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीस पाणीटंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. एप्रिलपासून खर्‍या अर्थाने कर्जत तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागात पाण्याची स्थिती गंभीर बनते. प्रामुख्याने खांडस, नांदगाव, अंभेरपाडा, पाथरज, कळंब आणि मोग्रज या ग्रामपंचायतींमध्ये पाण्याची स्थिती तेथील पाण्याच्या उद्भवांनी तळ गाठल्याने गंभीर झाली आहे. त्या सर्व ठिकाणी ग्रामपंचायतींकडून शासनाने पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी केली जात आहे. या ग्रामपंचायतींमधील पाणीटंचाईची विदारक स्थिती लक्षात घेऊन ग्रामपंचायतींकडून  टँकर सुरू करण्याची मागणी करणारे प्रस्ताव कर्जत पंचायत  समितीकडे आले आहेत. त्यामुळे 29 एप्रिल रोजी कर्जत पंचायत समितीच्या पथकाने सर्वाधिक पाणीटंचाई जाणवत असलेल्या भागात जाऊन पाणीटंचाईची स्थिती जाणून घेतली. गटविकास अधिकारी बाळाजी पुरी, लघु पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सुजित धनगर, कर्जत पंचायत समितीचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गोवर्धन नखाते आणि कृषी विभागाचे विस्तार अधिकारी चिंतामण लोहकरे यांनी पाणीटंचाईग्रस्त भागाचा दौरा केला.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply