नवी मुंबई : बातमीदार
लॉकडाऊनमुळे देशात उत्पादन क्षमता कमी झाली. परिणामी सरकारकडे पुरेसा कर जमा झाला नाही. त्यामुळे पालिकांनाही शासनाकडून निधी उपलब्ध होण्यास अडचणी येऊ शकतात. ही बाब लक्षात घेता आरोग्य, शिक्षण व मूलभूत सुविधांवरच निधी खर्च करावा, अशा सूचना आमदार नाईक यांनी आयुक्तांना केल्या आहेत. कोविड सेंटर उभारताना त्यातील मनुष्यबळाचे काय? मनुष्यबळ पूर्ण क्षमतेने नेमणे आवश्यक आहे, असे मत आमदार गणेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. सोमवारी (दि. 19) आमदार नाईक यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. त्याबाबत माहिती देताना ते बोलत होते. गणेशोत्सवात नागरिक कोविडसंदर्भातील नियम पायदळी तुडवताना दिसले. येत्या काळात अनेक सण येणार आहेत. पालिकेने खबरदारी घेत जनजागृती करणे गरजेचे आहे. शहरात सर्वत्र जागृती करणारे होर्डिंग्ज लावणे गरजेचे आहे. हिवाळ्यात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्या दृष्टीने पालिकेने खबरदारी घेण्याची सूचना आयुक्तांना केल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले. यासोबत 96 सफाई कंत्राटदार पालिका सुरू झाल्यापासून शहरात सेवा देत आहेत, मात्र आता नव्याने कंत्राट देताना एकदा नव्हे तर तीनदा मुदत वाढवली. जर आपल्याकडे कंत्राटदार आहेत तर उगाचच मुदत का वाढवली जात आहे. कोणाच्या राजकीय दबावापोटी ही मुदत वाढवून फायदा मिळवून देण्याचे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप या वेळी त्यांनी केला. कोरोनाच्या काळात अशा चुकीच्या पद्धतीने कारभार हाकला जात असल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही या वेळी त्यांनी दिला. दरम्यान, या वेळी आमदार नाईक यांनी आयुक्तांच्या कारभारावर समाधान व्यक्त केले आहे. माजी सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी आयुक्तांना झाडांच्या छाटणीबाबत प्रश्न उपस्थित केला. झाडे छाटणीच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने फांद्या तोडल्या जात असल्यास त्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.