Breaking News

लंकेची विंडीजवर सरशी

निकोलस पूरनचे झुंजार शतक व्यर्थ

चेस्टर ली स्ट्रीट : वृत्तसंस्था

विश्वचषक स्पर्धेत वेस्ट इंडीजविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेने 23 धावांनी विजय मिळवला. अविष्का फर्नांडोच्या विक्रमी शतकाच्या जोरावर श्रीलंकेने विंडीजला 339 धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना निकोलस पूरनने 118 धावांची झुंजार खेळी केली, पण ती खेळी व्यर्थ ठरली. या विजयासह श्रीलंकेने गुणतालिकेत सहाव्या स्थानी झेप घेतली, तर विंडीजच्या संघाला नवव्या स्थानी घसरावे लागले.

339 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजचे सुनील अम्ब्रीस आणि शाय होप हे दोघे प्रत्येकी 5 धावा काढून माघारी परतले. शिमरॉन हेटमायर आणि ख्रिस गेल या दोघांनी डाव सावरला, पण गेलदेखील मोठा फटका मारताना बाद झाला. पाठोपाठ हेटमायरदेखील 29 धावांवर परतला. निकोलस पूरनने कर्णधार जेसन होल्डरला साथीला घेत डाव पुढे नेला. विंडीजचा डाव सावरतो असे वाटत असतानाच होल्डर 25 धावांवर माघारी परतला. लगेचच कार्लोस ब्रेथवेटदेखील 8 धावा करून बाद झाला. फॅबियन ऍलनने दमदार अर्धशतक झळकावले, पण मोक्याच्या क्षणी तो बाद झाला. त्याने 51 धावा केल्या. शेवटच्या टप्प्यात फटकेबाजीची गरज असताना पूरनने शानदार शतक ठोकले, मात्र त्यानंतर तो लगेचच माघारी परतला आणि विंडीजच्या आशा मावळल्या. त्याने 103 चेंडूंत 11 चौकार आणि 4 षटकारांनिशी 118 धावा केल्या. श्रीलंकेकडून मलिंगाने सर्वाधिक तीन बळी टिपले.

तत्पूर्वी, श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर करुणरत्ने आणि कुशल परेरा यांनी 93 धावांची भक्कम सलामी दिली. मोठा फटका मारताना करुणरत्ने 32 धावांवर बाद झाला. कुशल परेराने डाव सावरत अर्धशतक पूर्ण केले. तो

64 धावांवर बाद झाला. त्यानंतर कुशल मेंडिसच्या साथीने फर्नांडोने डाव पुढे नेला. मेंडिस बाद झाल्यानंतर अनुभवी अँजेलो मॅथ्यूजने 20 चेंडूंत 26 धावा केल्या. अविष्का फर्नांडोने एक बाजू लावून धरली आणि दमदार शतक झळकावले. शतक ठोकल्यानंतर तो बाद झाला. त्याने 103 चेंडूंत 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 104 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लाहिरू थिरिमन्नेने नाबाद 45 धावा करून श्रीलंकेला तीनशे पार मजल मारून दिली.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply