बर्निंगहॅम : वृत्तसंस्था
रोहित शर्मा (104) आणि केएल राहुलच्या (77) चांगल्या सुरुवातीनंतर भारताच्या मधल्या फळीने पुन्हा एकदा हाराकिरी केली. त्यामुळे भारताला 50 षटकांत 9 फलंदाजांच्या 314 धावांपर्यंतच मजल मारता आली.
रोहितने यंदाच्या वर्ल्डकपमधील आपले चौथे शतक पूर्ण केले. याबरोबरच त्याने संगकाराच्या वर्ल्डकपमध्ये चार शतके ठोकण्याच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली, पण शतकानंतर रोहित लगेचच बाद झाला. सलामीवीर केएल राहुलने रोहितला साजेशी साथ देत 92 चेंडूंत 77 धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. भारतीय संघाची दमदार सुरुवात पाहता 350 धावा होतील असा अंदाज होता, मात्र भारताच्या मधल्या फळीने निराशा केली. कर्णधार कोहलीला मुस्तफिजुरने 26 धावांवर बाद केले, तर त्याच षटकात हार्दिक पंड्या शून्यावर माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघाची पीछेहाट झाली. पुढे ऋषभ पंतने 41 चेंडूंत 48 धावा करीत सामन्यात रंगत आणली होती, पण मोठा फटका मारण्याच्या नादात पंत तंबूत दाखल झाला. दिनेश कार्तिकने निराशा केली. कार्तिक अवघ्या 8 धावांवर बाद झाला. महेंद्रसिंह धोनीने अखेरच्या षटकांमध्ये धावा वसुल करण्याचा प्रयत्न केला, पण त्याला फारसे यश आले नाही. धोनीने 33 चेंडूंत 35 धावा केल्या. पुढे शमी (1), भुवनेश्वर कुमार(2) हे स्वस्तात बाद झाले आणि 50 षटकांच्या अखेरीस भारताला 9 बाद 314 धावा करता आल्या.