28 जूनपासून इंटरनेट सेवा बंद; पेन्शनर व खातेदारांचा संताप
कर्जत : बातमीदार
इंटरनेट सेवा बंद असल्याने युनियन बँकेच्या नेरळ शाखेचा कारभार ठप्प झाला आहे. त्यामुळे बँकेचे खातेदार आणि पेंशनर हे संतापले आहेत. युनियन बँक ही नेरळ गावातील पहिली बँक असल्याने त्या शाखेत तब्बल 30 हजार खातेदार आहेत. त्यातील 10 हजाराहुन अधिक करंट खाती असून, सर्व व्यापार्यांची खाती या नेरळमधील एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. मात्र या बँकेत सातत्याने इंटरनेट सेवा बंद असल्याने खातेदार नेरळमधील अन्य बँकांकडे वळले आहेत. प्रत्येक महिन्याचे पहिल्या तारखेला परिसरातील पेंशनर युनियन बँकेच्या नेरळ शाखेत जमत असतात. मात्र इंटरनेट सेवा बंद असल्याने 28 जूनपासून बुधवार (दि. 3) पर्यन्त बँकेचे सर्व व्यवहार ठप्प आहेत. बीएसएनएलकडून इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने सातत्याने बँकेचे व्यवहार बंद पडत आहेत. त्यामुळे ग्राहक संतप्त झाले आहेत. दरम्यान, शेजारी असलेले व्यापारी अरविंद कटारिया यांनी आपली जागा बँकेला स्वतःचे इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी देण्याची तयारी दाखवली आहे. बँकेच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयानेही नवीन इंटरनेट सेवा घेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध करुन दिली आहे. मात्र ही इंटरनेट सेवा उभी करण्यासाठी बँकेचे कर्मचारी गेल्या आठ दिवसापासून अभियंत्यांची वाट पहात आहेत. पेंशनर खातेदारांना पैसे मिळाले नसल्याने सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्यांनी बुधवारी (दि. 3) बँकेच्या नेरळ शाखा व्यवस्थापक अदिती म्हात्रे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. तसेच शाखेचे कामकाज का ठप्प होत आहे? याबद्दल जाब विचारला. त्यावेळी संघटनेचे अध्यक्ष हरिचंद्र टोकरे, राजाराम खडे, धोंडूराज बिवलकर, लक्ष्मण अभंगे, सुरेश जाधव यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. शाखा व्यवस्थापक म्हात्रे यांनी तत्काळ ठाणे येथील विभागीय कार्यालयाशी संपर्क साधला आणि लोकांच्या भावना तेथे पोहोचवल्या.
बँकेची स्वतःची इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी सर्व साहित्य आणले आहे. इंजिनीअर आल्यानंतर ही इंटरनेट सेवा सुरू केली जाईल. पुढील दोन दिवसात बँकेचे कामकाज सुरळीत होईल.
-अदिती म्हात्रे, शाखा व्यवस्थापक\