Tuesday , March 28 2023
Breaking News

विद्यार्थ्यांना दिले जाणारे वाघिणीचे दूध रोखलं?

जगात इंग्रजी भाषेच्या वापरात अमेरिका सर्वप्रथम आहे तर भारत दुसर्‍या स्थानावर आहे. इंग्लंड देश चौथ्या स्थानावर आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांसारख्या समाजसुधारकाने इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हटले आहे. मात्र, राज्यसरकारने सेमी इंग्रजी मिडियमच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या पाल्यांनाही हे वाघिणीचे दूध पिण्याची संधी उपलब्ध केली असताना पोलादपूर तालुक्यात मात्र झारीतील शुक्राचार्यांनीच हे वाघिणीचे दूध गोर-गरिबांच्या मुलांना शाळेमध्ये मिळण्यापासून रोखण्याच्या प्रयत्न यशस्वीपणे केलेला आहे.

पोलादपूर तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या सेमी इंग्लिश मिडीयम अभ्यासक्रमाला अचानक यंदापासून बाद करून मराठी मिडियमसोबत इंग्रजी भाषा असलेला अभ्यासक्रम शिकविला जात आहे. तालुक्यातील पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षण विभागाची मनमानी आता शासनाच्या निर्णयाला विरोध करणारी ठरली आहे. यामागे तालुक्यातील खाजगी इंग्लिश मिडियम शाळांसोबत प्राथमिक शिक्षण विभागाचे संगनमत असल्याची शंकाही काही मुख्याध्यापकांनी व्यक्त केली आहे.

गेल्यावर्षी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी खाजगी शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण विभागाचे उपक्रम राबविले. त्यावेळी पोलादपूर शहरातील एम्पॅथी फाऊंडेशनने बांधलेल्या प्राथमिक शाळा नं. 1च्या भव्य इमारतीचा वापर गटशिक्षणाधिकार्‍यांनी शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी जाणीवपूर्वक टाळला असल्याची मुख्याध्यापकवर्गामध्ये सुरू झाली. मात्र, त्यामागे पुढील शैक्षणिक वर्षामध्ये प्राथमिक शाळांमधून सेमीइंग्लिश मिडियम हद्दपार करण्याचा डाव शिजत असेल, अशी पुसटशीही शंका मुख्याध्यापकांना आली नव्हती. मात्र, यंदाच्या शैक्षणिकवर्षी गटसाधन केंद्राची इमारतीची दुरवस्था जाणून घेण्यासह पाठ्यपुस्तकांच्या वितरणाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी गेलेल्या प्रस्तुत प्रतिनिधीस सर्व पाठ्यपुस्तके केंद्रशाळा आणि केंद्र शाळांमार्फत रवाना झाल्याची माहिती देण्यात आल्याने याविषयी विविध वृत्तपत्रांच्या बातम्यांतून आश्चर्ययुक्त कौतुक व्यक्त करण्यात आले. मात्र, शैक्षणिक वर्ष सुरू होताच भाई पाटेकर या सवाद येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस त्यांच्या पाल्यास गेल्या तीन वर्षांप्रमाणे सेमी इंग्लिशमध्ये शिकविण्याऐवजी मराठी मिडियमची पाठयपुस्तके देण्यात आली असून मराठी मिडियममध्येच शिकविले जात असल्याने पाल्याचा मानसिक गोंधळ उडाला असल्याची माहिती दिली.

याबाबत पोलादपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने प्रस्तुत प्रतिनिधीस प्रथम सविस्तर माहिती घेऊन कळविण्याची ग्वाही दिली. मात्र, त्यानंतर उडवाउडवीची उत्तरे सुरू झाल्याने याबाबत अधिक माहिती मिळविण्याची आग्रही भूमिका घेतल्यानंतर पोलादपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. भूषण जोशी यांनी माहिती देण्यासंदर्भात सहकार्याची भूमिका दर्शविली. यामुळे गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांच्याकडून सहीशिक्क्याने प्राप्त झालेल्या कागदपत्रांनुसार पोलादपूर तालुक्यातील 133 प्राथमिक शाळांपैकी केवळ तुर्भे केंद्रांतर्गत असलेल्या 12 प्राथमिक शाळांपैकी केवळ नऊ प्राथमिक शाळांमध्ये सेमी इंग्लिश अभ्यासक्रम सुरू असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलादपूर तालुक्यातील 124 प्राथमिक शाळांमधून यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सेमी इंग्लिश मिडीयम अभ्यासक्रम बाद होण्यामागील कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता स्थानिक शालेय व्यवस्थापन समितीने मुख्याध्यापकांना पत्र देऊन आमच्या पाल्यांना इंग्रजी माध्यमातून शिकायचे नसल्याने सेमी इंग्लिश मिडियमऐवजी मराठी माध्यमातून शिकवावे, अशी शिफारसपत्रे मुख्याध्यापकांनी मागील शैक्षणिक वर्षाअखेरिस गटशिक्षणाधिकारी सुभाष साळुंखे यांच्याकडे दिल्यानंतर यंदाच्या शैक्षणिक वर्षात सुरूवातीपासूनच सेमी इंग्लिश मिडीयमऐवजी मराठी मिडियममध्येच शिकविण्याचा छुपा अजेंडा राबविण्यात आला.

यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वीच यंदा मराठी माध्यमाच्या सुमारे 3 हजार 522 आणि 94 ऊर्दू माध्यमाच्या लाभार्थी विद्यार्थ्यांसाठी अशा एकूण 3 हजार 616 विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले सुमारे 21 हजार 402 पाठ्यपुस्तकांची मागणी असताना 21 हजार 328 पाठ्यपुस्तके उपलब्ध होऊन त्यापैकी 20 हजार 448 पाठ्यपुस्तकांचे वाटप करून यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच सेमी इंग्लिश माध्यमांच्या पुस्तकांऐवजी मराठी माध्यमाची पुस्तके पोहोचवून सेमी इंग्लिश अभ्यासक्रम पोलादपूर तालुक्यातून बहुतांशी हद्दपार करण्यात पोलादपूर पंचायत समितीच्या प्राथमिक शिक्षण विभागाला यश आले. मात्र, आपल्या मुलांचा नियमित अभ्यास घेणार्‍या एकाच जागरूक पालकाला मुलाची मानसिक घालमेल लक्षात आल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे.

शासनाच्या परिपत्रकानुसार चार वर्षांपूर्वी सुरू झालेले सेमी इंग्लिश अभ्यासक्रम यंदापासून अचानक बंद करण्यात आल्याने सेमी इंग्लिश मिडियमचा शासनाचा निर्णय पोलादपूर तालुक्यात लागू होणार नसल्याचे दिसून येत आहे. पोलादपूर पंचायत समितीचा शिक्षण विभाग याप्रकरणी मुख्याध्यापक आणि स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीच्या पत्राचा हवाला देऊन कानावर हात ठेवत असताना या प्रकरणाचा कोणीतरी सूत्रधार असल्याखेरिज तालुक्यातील 124 शाळांमधून यंदा शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच पोहोचलेल्या पाठ्यपुस्तकांनुसार सेमी इंग्लिश मिडियम हद्दपार होणार नाही, याची सर्वांनाच कल्पना आली आहे.

यामुळे गोर-गरिबांच्या पाल्यांना प्राथमिक शाळेतून मिळणार्‍या इंग्लिश माध्यमाच्या शिक्षणापासून वंचित ठेवण्यासोबतच सेमी इंग्लिश आणि इंग्लिश मिडियम शिकवायचे असल्यास भरमासाठ फी भरून खासगी शाळांमध्ये जाण्याचा एकमेव पर्याय तालुक्यात यामुळे शिल्लक राहिला असून खासगी इंग्लिश मिडियम शाळांसोबत साटंलोटं करून सेमी इंग्लिश मिडियम बंद पाडणारा झारीतील शुक्राचार्य कोण हे आता शिक्षणप्रेमींना उघड झाले आहे. मात्र, आता यंदापासूनच सेमी इंग्लिश मिडियम पूर्ववत कसे करता येईल, यासाठी रायगड जिल्हा परिषदेतील स्थानिक लोकप्रतिनिधी कोणती भूमिका घेतील, याकडे सर्वसामान्य पालक वर्गाचे लक्ष लागले आहे.

– शैलेश पालकर

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply