Breaking News

मिनी गोवा बदनाम होतोय

अलिबाग म्हटलं की निळाशार समुद्र, स्वच्छ किनारे, नारळपोफळीच्या बागा, गर्द हिरवी झाडी. मुंबई, पुणे यासारख्या शहरांमधून कमी वेळेत पाहचता येते. या परिसरात मिळणारी ताजी मासळी, तांदळाची भाकरी, येथील लोक, येथील संस्कृती यामुळे अलिबागची एक वेगळीच ओळख आहे. कुटुंबीयांसह पर्यटनासाठी अलिबाग हे एक सर्वात सुरक्षित पर्यटनस्थळ आहे, अशी आलिबागची ओळख आहे. त्यामुळेच अलिबागला येणार्‍या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, परंतु मागील आठवड्यात अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनार्‍यावर असलेल्या एका बंगल्यात छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पर्दाफाश केला. यावरून अलिबाग व आसपासचा परिसर  अमली पदार्थ व अनैतिक धंद्यांच्या विळख्यात सापडला हे सिद्ध होतंय. यातून आलिबागची बदनामी होत आहे.

अलिबागच्या किनारपट्टी भागातील बंगले भाड्याने घेऊन  अशाप्रकारे देहविक्रीचा व्यवसाय आणि अमली पदार्थांचा व्यापार चालत असल्याची चर्चा सुरू होतीच, परंतु त्याबद्दल कुणी बोलत नव्हते. याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनीच या धंद्यात असलेल्या काही लोकांचे मोबाईल नंबर मिळवले. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ठराविक रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास सांगितली. त्यानंतर त्यांच्या संपर्कात असलेल्या मुलींची नावे कळवून सौदा निश्चित केला. त्याप्रमाणे दोन बंगले ऑनलाईन बुक करण्यात आले. तेथे अशा पार्टीचे आयोजन करण्यात आले. तेथे बनावट ग्राहक पाठवून त्याच्याकडे पैसेही देण्यात आले. या बोगस गिर्‍हाईकाकरवी या रॅकेटचा भांडाफोड केला. महिला पोलिसांनी काही महिलांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे 26 ग्रॅम कोकेन आढळून आले. कोकेन दिल्याबद्दल या प्रकरणात आणखी  पाच जणांना पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 50 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

समुद्रकिनारा असल्यामुळे मागील काही वर्षापासून अलिबाग हे मिनी गोवा म्हणून ओळखले जाते, परंतु गोव्याच्या समुद्रकिनार्‍यांवर चालणारे इतर उद्योग येथे चालत नाहीत. गोव्याची संस्कृती वेगळी आहे. अलिबागची संस्कृती वेगळी आहे. त्यामुळे कुटुंबीयांसह लोक अलिबागलाच येणे पसंत करतात, परंतु आत अनैतिक धंदे व अमलीपदार्थांच्या विळख्यात अलिबाग अडकत चाललेले आहे. त्यामुळे अलिबागची बदनामी होत आहे. रायगड जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने असे धंदे करणार्‍यांवर कारवाई करून एक चांगले पाऊल उचलले आहे.  पोलिसांनी कारवाई केली त्यात नाजयेरिन नागरिक आहेत. त्यावरून याची व्याप्ती कुठपर्यंत पोहचली आहे याचा अंदाज आपण करू शकतो.

अलिबाग परिसरात चालणार्‍या अनैतिक धंद्यावर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईतील आरोपींची नावे पाहता यात अलिबागमधील कुणीच नाही. जे आरोपी आहेत ते मुंबई, तसेच इतर शहरातील आहेत, तसेच परदेशातील आहेत. एक वर्षापूर्वी एक हॉटेलमध्ये पोलिसांनी कारवाई केली होती, त्या परदेशी माहिला होत्या. आताही जी कारवाई करण्यात आली आहे त्यात काही परदेशी नागरिक आहेत. अलिबागकर यात नसले तरी या घटना अलिबाग व आसपाच्या परिसरामध्ये होत आहेत. त्यामुळे आलिबागची बदनामी होत आहे. अलिबागची एक संस्कृती आहे. तीच पुसली जातेय. अलिबागसे आया है क्या असे कुणी विचारले तर अलिबागकरांना राग येतो. अलिबागकरांची अस्मिता जागी होते, परंतु आतातर अलिबागच्या संस्कृतीवरच घाला घातला जात आहे. त्यातून आलिबागची बदनामी होत आहे. याबाबत कुणीच आवाज उठवत नाही. खरंतर पुढील धोका ओळखून आताच जागे व्हायला पाहिजे. केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता आसपासच्या बंगल्यामध्ये किंवा मोकळ्या घरांमध्ये काय चालतेय यावर तेथील लोकांनीच नजर ठेवली पाहिजे. कोण येतोय कोण जातोय यावर लक्ष ठेवले पाहिजे. अलिबाची बदनामी रोखायची असेल तर हे करावेच लागेल.

रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अनैतिक धंदे व अमली पदार्थांविरोधात कारवाई केली. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. समाजात जे काही अनैतिक आहेत त्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई केलीच पाहिजे, परंतु अशा कारवायांचे नंतर काय होते हे समजत नाही. अशा कारवाया केल्यानंतर वर्तमानपत्रे, वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्या येतात. थोडे दिवस चर्चा होते, परंतु नंतर यातील आरोपींचे काय होते. काय शिक्षा होते, काहीच समजत नाही. एक वर्षापूर्वी अशीच कारवाई करून पोलिसांनी अलिबागजवळील एक पंचतरांकीत हॉटेलमध्ये चालणार्‍या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर अलिबाग शहरातील एक हॉटेलमध्ये धाड टाकून काही महिलांना अटक केली होती. आतापर्यंत झालेल्या कारवायांमध्ये आरोपींना शिक्षा झाली की त्यांची निर्दोष सुटका झाली हे समजले नाही. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत त्यांच्या हेतूबाबत शंका निर्माण होऊ शकते. त्यामुळे अशा कारवायांमध्ये आरोपींना शिक्षा होईल याची दक्षता देखील पोलिसांनी घ्यायला हवी. या कारवाया दिखाऊपणा ठरणार नाहीत याची खबरदारी पोलिसांनीच घेतली पाहिजे.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

जाहीर धुव्वा

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन शुक्रवारी संपले. या संपूर्ण अधिवेशनाच्या काळात विरोधी पक्षाचे नेते पूर्णत: निष्प्रभ झालेले …

Leave a Reply