रोहे : रामप्रहर वृत्त
नव मतदार विकासाचा भागिदार या मोहिमेअंतर्गत भाजप युवा मोर्चा मार्फत नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येत असून, त्यात सहभागी होऊन कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त नव मतदार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी बुधवारी (दि. 3) रोहे येथे केले.
रोहा तालुका भाजपची मासिक सभा बुधवारी संध्याकाळी येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती. मंडळ अध्यक्ष सोपान जांभेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत भाजपकडून विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबविले जाणार आहेत, त्याबाबतची माहिती देण्यात आली. यावेळी कृष्णा कोबनाक उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात पाच हजार नविन मतदार नोंदणीचे उदिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
6 जुलैपासून भाजप सदस्यता अभियान सुरू होणार आहे. यात नवीन सदस्य नोंदणी तसेच असलेल्या सदस्यांची माहिती नव्याने भरून घेतली जाणार आहे. याखेरीज 1 ते 15 ऑगस्ट दरम्यान भाजप महिला मोर्चाच्या कार्यकर्त्या रक्षाबंधन कार्यक्रम राबविणार असल्याचे श्री. कोबनाक यांनी सांगितले.
भाजपचे पेण विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विष्णू पाटील, अलिबाग विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष महेश मोहिते, रोहा तालुका समन्वय समिती अध्यक्ष संजय कोनकर, संपर्क प्रमुख राजेश मापरा, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमित घाग, तालुका सरचिटणीस सजंय लोटणकर, शहर अध्यक्ष शैलेश रावकर, अनंत लाड यांच्यासह तालुका पदाधिकारी, मोर्चा व आघाड़्यांचे पदाधिकारी, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथ अध्यक्ष उपस्थित होते.
-भाजपकडून ‘दिसतोय फरक शिवशाही परत’ हा उपक्रम राबवला जाणार असून, यात भाजप सरकारकडून राबविण्यात आलेल्या विविध योजना आणि त्याचे सर्वसामान्यांना झालेले फायदे तसेच विविध यशस्वी उपक्रमांची माहिती प्रत्येक मतदारापर्यंत पोचवली
जाणार आहे.
-कृष्णा कोबनाक